धुळे : अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल व पुनर्वसन विभागाने जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी तब्बल ११ कोटी ६१ लाख ८२ हजार रुपयांच्या विशेष मदत पॅकेजला मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ३० ऑक्टोबर २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार राज्यातील विविध विभागांतील बाधित शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर १०,००० रुपयांच्या दराने मदत देण्यात येणार आहे. नाशिक विभागातील धुळे जिल्ह्यात १६,४२९ शेतकरी बाधित असून त्यांच्याकडे एकूण ११,६१८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या अनुषंगाने शासनाने ११.६१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. या मदतीचा लाभ प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डिबिटी) पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

राज्यातील एकूण नुकसान पाहता, पुणे, नाशिक आणि अमरावती या विभागातील २१.६४ लाख शेतकरी बाधित झाले असून १७.६५ लाख हेक्टर क्षेत्रावर अवकाळी पाऊस आणि पुराचा फटका बसला आहे. एकूण १७६५ कोटी रुपयांचा निधी राज्यभरात वितरित करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यात मुख्यतः कापूस, मका, बाजरी आणि सोयाबीन या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात बियाणे आणि खतांची टंचाई निर्माण झाली असून येणाऱ्या रब्बी हंगामासाठी शासनाने जाहीर केलेली ही आर्थिक मदत दिलासा देणारी ठरणार आहे. जिल्हा प्रशासनाला निधी योग्य आणि पारदर्शक पद्धतीने वितरण करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. या मदतीमुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी आवश्यक बियाणे व कृषी साहित्य खरेदी करता येणार असून अवकाळी पावसाच्या फटक्यातून पुन्हा उभे राहण्यास हातभार लागणार आहे.

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात सतत ढगाळ वातावरण असून दुपारनंतर अधूनमधून पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः कापसाची तयार झालेली बोंडे अवकाळी पावसाच्या तडाख्यात भिजल्याने उत्पादनाची गुणवत्ता घटली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पिकाची काढणी सुरू केली होती; मात्र दिवाळीच्या काळात मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने अनेकांना वेळेवर कापूस काढता आला नाही. परिणामी, उभ्या पिकांची हानी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ज्यांनी आधीच कापूस काढून साठवला आहे ते शेतकरी आता शासन खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत. शासनाकडून अजूनही कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. काही शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणींमुळे खासगी व्यापाऱ्यांना कमी भावात कापूस विक्री करून तात्पुरती कोंडी सोडवली असून, पुढील हंगामाची तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात कापूस पिकासोबतच मका, बाजरी आणि सोयाबीन या पिकांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. पिकांची ओल आणि जमिनीत वाढलेला ओलसरपणा यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे की शासनाने तातडीने कापूस खरेदी केंद्र सुरू करून हमीभावाची घोषणा करावी, तसेच नुकसानीचे पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी नैसर्गिक आपत्ती आणि शासनाच्या विलंबित भूमिकेच्या दुहेरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी मागणी केली आहे की, धुळे जिल्ह्यासाठी त्वरित कापूस खरेदी केंद्रे सुरू करून डिबिटी पद्धतीने शेतकऱ्यांना मदत वितरित करावी, जेणेकरून रब्बी हंगामासाठी शेतकरी सावरण्याची संधी मिळेल.

दरम्यान, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात नाफेडच्यावतीने हंगाम २०२५-२०२६ मधील मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी महाफेडच्यावतीने शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शासनाने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ही नोंदणी सुरू केली असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी आर. एस. इंगळे यांनी दिली. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनासाठी हमीभाव मिळावा यासाठी ३० ऑक्टोबर पासून नोंदणी करण्याची सोय केली असुलुन ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ती करता येणार आहे. खरेदी प्रक्रिया १५ नोव्हेंबर २०२५ पासून पुढील ९० दिवसांपर्यंत सुरू राहणार आहे. या उपक्रमासाठी पणन महासंघाच्या वतीने एकूण सहा खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी ऑनलाईन पीकपेरा असलेला सातबारा, ८-अ, आधारकार्ड आणि राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक सोबत घेऊ अधिकारी केंद्रांवर नोंदणी करावी. नोंदणी करताना शेतकऱ्यांची उपस्थिती आवश्यक असून, पीओएस मशीनद्वारे बायोमेट्रिक किंवा फेस ऑथेंटिकेशन प्रणालीचा वापर बंधनकारक आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे. मूग, उडीद आणि सोयाबीनसाठी केंद्र शासनाने हमीभाव निश्चित केला आहे. त्यानुसार मूगासाठी प्रति क्विंटल ८,७६८, उडीदासाठी ७८०० आणि सोयाबीनसाठी ५,३२८ रुपये असा आधारभूत दर जाहीर करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यातील नोंदणी केंद्रे आणि कंसात संपर्क क्रमांक – धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लि. धुळे, शिरपूर तालुका सहकारी खरेदी विक्री सोसायटी लि. शिरपूर, शिंदखेडा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. दोंडाईचा, शेतकरी सहकारी संघ लि. साक्री, तसेच नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी सहकारी संघ लि. नंदुरबार आणि शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. शहादा, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या हंगामी पिकांची नोंदणी करून हमीभाव योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी आर. एस. इंगळे यांनी केले आहे.