धुळे : देवपूरातील रावसाहेब पाटील आणि वैभव पाटील या पिता-पुत्रांच्या खून प्रकरणात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांनी आरोपी माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार, त्याचा पुत्र गौरव पवार, जयराज पाटील यांच्यासह अकरा आरोपींना दुहेरी जन्मठेपेची, तर एका आरोपीस पाच वर्षाची शिक्षा सुनावली. या निकालाने आरोपींना रडू कोसळले, तर त्यांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झालेत.
देवपूर परिसरात आठ जून २०१८ रोजी पूर्ववैमनस्यातून रावसाहेब पाटील व त्यांचा मुलगा वैभव पाटील या पितापुत्रांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. या खून खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांच्या समोर झाली. उभय पक्षाचा युक्तिवाद, परिस्थितीजण्य पुरावे, नोंदविण्यात आलेल्या साक्ष अशा सगळ्याच पातळीवरील नोंदी घेतल्यावर न्यायालय विशिष्ठ निष्कर्षाला आले आणि या प्रकरणात माजी नगराध्यक्ष बाजीराव ऊर्फ सुभाष सजन पवार, भूपेश वाल्मिक पाटील, हर्षल ऊर्फ दादू रविंद्र पाटील, जयराज शामकांत पाटील, ऋषिकेश शामकांत पाटील, दर्शन अंबादास परदेशी, भगवान नानाभाऊ अहिरे, अर्जुन ऊर्फ आप्पा भगवान अहिरे, गौरव बाजीराव पवार, भूषण बाबुराव कापकर आणि भूषण निंबा पगारे या ११ आरोपींना दोषी ठरविण्यात आले. भा.दं.वि.कलम ३०२ अन्वये सर्व ११ जणांना तर संदीप ऊर्फ विक्की दिलीप वेळीस यास भा.दं.वि. कलम २१२ अंतर्गत आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले.
न्यायाधीश पुलाटेंनी आज सुनावली कठोर शिक्षा!
धुळे न्यायालयात गुरुवारी या खटल्याचा निकाल असल्याने नातेवाईकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी साडेतीन वाजता न्यायालयीन कामकाजाला सुरुवात झाली. सर्व आरोपींना न्यायाधीशांसमोर उभे करण्यात आले. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांनी माजी नगराध्यक्ष बाजीराव ऊर्फ सुभाष सजन पवार, गौरव बाजीराव पवार, भूपेश वाल्मिक पाटील, हर्षल ऊर्फ दादू रविंद्र पाटील, जयराज शामकांत पाटील, ऋषिकेश शामकांत पाटील, दर्शन अंबादास परदेशी, भगवान नानाभाऊ अहिरे, अर्जुन ऊर्फ आप्पा भगवान अहिरे, भूषण बाबुराव कापकर आणि भूषण निंबा पगारे या ११ आरोपींना भादवि ३०२ अन्वये दुुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर तर संदीप ऊर्फ विक्की दिलीप वेळीस यास भा.दं.वि.
कलम २१२ अंतर्गत पाच वर्षाची शिक्षा सुनावली.
आरोपी संदीप वेळीस हा गेल्या साडेसात वर्षापासून तुरुंगात असल्याने त्याने पाच वर्षापेक्षा अधिक शिक्षा भोगली आहे. यामुळे पाच हजार रुपयांचा दंड भरुन त्याची या खटल्यातून सबळ पुराव्या अभावी सुटका करण्याचे आदेश देण्यात आले. शिवाय, घटना घडली त्या दिवशी वैभव ऊर्फ सोनू अरुण पवार हा संशयित अमळनेर येथे असल्याचे पुराव्यांतून स्पष्ट झाल्याने न्यायालयाने त्याला आधीच आरोपमुक्त केले होते. दरम्यान, या खटल्यात जिल्हा सरकारी वकिल अॅड.देवेंद्र तवर यांच्यासह फिर्यादी पक्षातर्फे अॅड.निलेश दुसाणे यांनी प्रभावी युक्तिवाद करुन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती.
या खटल्यातील आरोपी बाजीराव पवार याने कट रचला होता. यानंतर रावसाहेब पाटील व वैभव पाटील या पित्रापुत्रांची निर्घृन हत्या करण्यात आली. या खून खटल्यात एकूण १३ आरोपी होते. त्यातील बाजीराव पवारसह ११ आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दुर्मिळातील दुर्मिळ असा हा खटला होता, की ज्यात अकरा आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
अॅड.देवेंद्र तंवर
जिल्हा सरकारी वकिल, धुळे जिल्हा.
