धुळे : निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने नियोजन सुरू केले आहे. शेतकरी आणि शेतमजूर हे शासनाच्या केंद्रस्थानी असून, त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी (दि.४) दिली.

धुळे तालुक्यातील कासविहीर गाव परिसरातील दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, माजी आमदार कुणाल पाटील, आमदार राम भदाणे, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी बावनकुळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत खरीप हंगामातील नुकसानीची माहिती घेतली. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. कासविहीर परिसरातील प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर परिस्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट झाले असून, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी नमूद केले.

पंचनामे पूर्ण करण्यावर भर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पंचनामे अचूक होणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यात ७० टक्क्यांहून अधिक पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित पंचनाम्यांचे कामही वेगाने सुरू आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

दुष्काळी परिस्थितीसाठी व्यापक नियोजन

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन शासनाने २६५ हून अधिक तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत. आणखी काही तालुक्यांचा समावेश करून हा आकडा वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे. शेतातील पाणी शेतात आणि गावातील पाणी गावात जिरविण्याचा प्रयत्न राहणार आहे. जलसंधारणाची कामे, शेतरस्ते आणि रोजगार निर्मितीच्या माध्यमातून शेतमजूर व महिलांना काम उपलब्ध करून दिले जाईल,” असे बावनकुळे यांनी सांगितले.

कर्जवसुलीच्या नावाखाली त्रास नको

दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी फोन करून त्रास देऊ नये, अशा सूचना बँका आणि वित्तीय संस्थांना देण्यात आल्या आहेत. तसेच अवैध सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. ‘एरंडोल येथे पाहणी करताना अवैध सावकारांविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. अवैध सावकारांमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत असेल तर अशा सावकारांचे कंबरडे मोडण्याचे काम शासन करेल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळ निवारण समिती करणार शिफारसी

मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ निवारण आणि उपाययोजनांसाठी ११ मंत्र्यांची उपसमिती स्थापन केली असून, या समितीचे अध्यक्षपद आपल्याकडे असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. ही समिती परिस्थितीचा गांभीर्याने आढावा घेत असून, आवश्यक शिफारसी मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऑक्टोबर महिन्यातही मे महिन्यासारखे कडक ऊन जाणवत आहे. परिस्थिती अत्यंत बिकट आहे. जनतेच्या आणि माय-बापांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यासाठी शासन पूर्ण ताकदीने काम करत आहे, दरम्यान, धुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा हा पहिला दौरा असून, आवश्यकतेनुसार वारंवार जिल्ह्यात येऊन उपाययोजनांचा आढावा घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.