धुळे : धुळे जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्यानंतर आता याचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय चढाओढ सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून दुष्काळ जाहीर होण्याचे श्रेय घेण्यासाठी पत्रकबाजी सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार टीका करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ‘धुळ्याचे नाव दुष्काळी यादीत येण्याचे खरे श्रेय गौतमी पाटील आणि रशियन नृत्यांगनेच्या कार्यक्रमांना जाते. या कार्यक्रमांमुळे झालेल्या चर्चेनंतरच सरकारला धुळ्यातील परिस्थितीची जाणीव झाली’, असा टोला शिवसेना उबाठाने लगावला आहे.

शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर टीका केली आहे. ‘धुळे जिल्ह्यात दुष्काळाची तीव्र परिस्थिती निर्माण झालेली असताना काही लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले नाच-गाण्यांचे कार्यक्रम राज्यभर चर्चेचा विषय ठरले. शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांपेक्षा अशा कार्यक्रमांमुळे जिल्ह्याची प्रतिमा राज्यस्तरावर चर्चेत आली. शिवसेनेने या प्रकाराविरोधात आवाज उठवला, तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतरच सरकारला जाग आली’, असा आरोप त्यांनी केला.

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षातील पालकमंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांकडून श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू झाल्याची टीका शिवसेनेने केली आहे. ‘शेतकरी पावसाअभावी संकटात असताना राज्यकर्ते कुंभकर्णी झोपेत होते. आंदोलन, जनतेचा रोष आणि शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती समोर आल्यानंतर सरकारला हालचाली कराव्या लागल्या. धुळे जिल्ह्याचा दुष्काळी यादीत समावेश झाला नाही तर शेतकरी आपल्याला माफ करणार नाहीत, याची जाणीव एका रात्रीत झाली’, असा दावा पत्रकातून करण्यात आला आहे. शिवसेना उबाठाने दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता प्रशासनाच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पुनर्गठन, कर्जवसुलीस स्थगिती, रोजगार हमी योजनेतून शेतमजुरांना कामे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे तसेच टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे पक्षाने म्हटले आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळणे गरजेचे आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करताना कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यावी. मंडळनिहाय समाविष्ट गावांमध्ये पंचनामे योग्य पद्धतीने होत आहेत की नाही, यावर शिवसेना लक्ष ठेवणार आहे. पंचनाम्यांमध्ये दिरंगाई किंवा त्रुटी आढळल्यास प्रशासनाच्या विरोधातही आवाज उठविला जाईल’, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

शेतकऱ्यांना पंचनामे किंवा दुष्काळी मदतीसंदर्भात कोणतीही अडचण आल्यास धुळे येथील प्रबोधनकार ठाकरे संकुलातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना उबाठाचे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, युवा सेना तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे. दरम्यान, धुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांसमोरील संकटाची तीव्रता कायम आहे.