धुळे : अल्पावधीत मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका अभियंत्याची तब्बल तीन कोटी १४ लाख ९९ हजार ८९१ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून विशाल आनंद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सायबर गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईतील समाधानाची बाब म्हणजे सायबर पोलिसांनी फसवणुकीतील एक कोटी १९ लाख रुपये गोठवून ते तक्रारदारास परत मिळवून दिले आहेत.
प्रकरणाची सुरुवात कशी ?
याप्रकरणी हर्षद नारायण देशपांडे (रा. स्नेहनगर, धुळे) यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, देशपांडे यांच्या मोबाईलवर एक संशयास्पद लिंक पाठवून त्यांना “848FYERS HNI VIP Growth Hub” या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले. त्यानंतर “FYERS INDIA (HNI)” नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. शेअर मार्केट ट्रेडिंग, आयपीओ गुंतवणूक आणि प्रीमियम ट्रेडिंग सुविधांच्या माध्यमातून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष त्यांना दाखवण्यात आले.
नेमके घडले काय?
सुरुवातीला काही व्यवहारांमध्ये छोट्या रकमेवर देशपांडे यांना परतावा देण्यात आला. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर अधिक नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने संशयितांनी देशपांडे यांच्याकडून वेळोवेळी आरटीजीएस, एनईएफटी आणि यूपीआयद्वारे विविध बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्यास सांगितले.
देशपांडे यांनी विविध व्यवहारांतून तब्बल तीन कोटी १४ लाख ९९ हजार ८९१ रुपये संशयितांच्या खात्यांमध्ये वर्ग केले. मात्र, त्यानंतर त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. तसेच संशयितांनी संपर्क टाळण्यास सुरुवात केल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
नायगाव (वसई) परिसरात बनावट कॉल सेंटर
तपासादरम्यान धुळे सायबर पोलिसांनी डिजिटल व्यवहार, बँक खात्यांची साखळी, मोबाईल क्रमांक, आयपी लॉग आणि तांत्रिक पुरावे तपासले. तपासात नायगाव (वसई) परिसरात बनावट कॉल सेंटर सुरू असल्याचे समोर आले. या कॉल सेंटरमधून संशयित विविध नागरिकांशी संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत होते. बनावट ट्रेडिंग अॅप्स, व्हॉट्सअॅप ग्रुप आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नागरिकांना जाळ्यात ओढले जात असल्याचे उघड झाले. या कारवाईत पोलिसांनी फसवणुकीतील एक कोटी १९ लाख रुपये गोठवून परत मिळवण्यात यश मिळवले आहे. तसेच डिजिटल व्यवहारांशी संबंधित माहिती, मोबाईल फोन, बँक व्यवहारांचे दस्तऐवज आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सहा जणांविरुद्ध गुन्हा; चौघांना अटक
या प्रकरणात पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांची नावे अशी- साबीर मोहम्मद खान (५०, रा. नवी मुंबई), सनत संजीव दास (५२, रा. वसई पश्चिम), राहुलकुमार शुक्ला उर्फ कैलाश राकेशकुमार (२४, रा. मिरारोड पूर्व, जि. ठाणे), आमिर करमशेर खान (३४, रा. मानगो, जमशेदपूर, झारखंड), अभिषेक अनिल नारकर उर्फ गोपाल (रा. अंधेरी पूर्व, मुंबई), मोहम्मद रशीद फकीर मोहम्मद बलोच उर्फ लक्की (रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई), रोशनकुमार सिथारामा शेट्टी (रा. उडपी, कर्नाटक). यापैकी साबीर मोहम्मद खान, सनत संजीव दास, राहुलकुमार शुक्ला उर्फ कैलाश राकेशकुमार आणि आमिर करमशेर खान या चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली धुळे सायबर पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने केली.
पोलिसांचे आवाहन
दरम्यान, धुळे पोलिसांनी नागरिकांना ऑनलाइन गुंतवणुकीबाबत विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना केवळ ‘सेबी’ नोंदणीकृत ब्रोकर्समार्फत अधिकृत डिमॅट खात्याचाच वापर करावा. अवास्तव परताव्याचे आश्वासन, अनोळखी अॅप्स, व्हॉट्सअॅप गुंतवणूक ग्रुप, संशयास्पद लिंक किंवा सोशल मीडियावरील आर्थिक सल्ल्यावर विश्वास ठेवू नये. कोणतीही सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा जवळच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
