धुळे : जिल्ह्यात शेतकरी वेगवेगळे प्रयोग करुन पीक उत्पादन काढू लागले आहेत. जिल्ह्यातील लोणखेडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष रमेश पाटील यांनी येथील हेक्टरी ७५ क्विंटल मक्याचे पिक घेवून एका शेतकऱ्याने विशेष प्रयोगाची खात्री दिली आहे. केशर आंबा, पेरू, चिकू, सीताफळ, रामफळ, लिंबू आदी फळपिकांचे विक्रमी उत्पादन घेतल्यानंतर मक्याचे हेक्टरी ७५ क्विंटल पीक काढले आहे. यानिमित्त त्यांचा सत्कारही करण्यात आला.
कृषी दिनाचे औचित्य साधून धुळे येथील कृषी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात रमेश पाटील यांचा पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ, प्रमाणपत्र आणि तीन हजार रुपये रोख असे बक्षीस देऊन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सीताराम चौधरी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. कृषी महाविद्यालयात राज्य शासनाचा कृषी विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समितीचा कृषी विभाग आणि आत्मातर्फे अशा प्रयोग करणाऱ्या आणि प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमांस जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय फडोळ, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर,आत्माचे प्रकल्प संचालक हितेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते. २०२४-२५ या वर्षीच्या खरीप हंगामात पाटील यांनी मक्याचे हेक्टरी ७४.८० क्विंटल उत्पादन घेतले.
पाटील हे आपल्या शेतीत सातत्याने विविध पिकांचे भरघोस उत्पन्न घेतात. त्यांनी आपल्या शेतात विविध फळझाडांची लागवड केली आहे. विशेषतः केशर आंबा, पेरू, चिकू, सीताफळ, रामफळ, लिंबू आदींचेही ते दर वर्षी भरघोस उत्पादन घेत असतात. विशेष म्हणजे स्वतः विविध फळझाडांवर कलम करून उत्पादन घेण्यात त्यांचा हातखंडा आहे.
मी शेतात अनेक वर्षांपासून विविध प्रयोग करून कमी जागेत अधिकाधिक उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतो. कुठला पुरस्कार मिळविण्यासाठी नव्हे तर, आवड म्हणूनच असे प्रयोग केले आहेत. यामुळे अनेक प्रकारची फळझाडेही बहरली. पर्यायाने उत्पन्न वाढले. स्वतः कलम करून फळझाडातून उत्पन्न वाढीचा प्रयोग केला आहे. – रमेश पाटील (प्रयोगशील शेतकरी, लोणखेडी, धुळे)