धुळे : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी भुईमूग व उन्हाळी तीळ पिकासाठी विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे.या योजनेत धुळे जिल्ह्यासह राज्यातील नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे.

देशात खाद्यतेलांच्या वाढत्या आयातीमुळे परकीय चलनाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून देशांतर्गत तेलबिया उत्पादन वाढविण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन भुईमूग व उन्हाळी तीळ पिकासाठी १०० टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) र. शा. नाईकवाडी यांनी केले आहे.

अलिकडेच खाद्यतेलाच्या दरात पुन्हा वाढ जाणवू लागली असून याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांसोबतच शेतकऱ्यांवरही होत आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी अशी योजना उपयुक्त ठरणार आहे. या अभियानांतर्गत उत्पादकता वाढविणे, सुधारित वाणांचा वापर वाढविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत उन्हाळी भुईमूग पिकासाठी प्रति हेक्टर १५० किलो प्रमाणात तसेच उन्हाळी तीळ पिकासाठी प्रति हेक्टर २.५ किलो प्रमाणित बियाणे पूर्ण अनुदानावर वितरित करण्यात येणार आहे.

भुईमूग पिकासाठी नाशिक, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि अकोला या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे. तर तीळ पिकासाठी जळगाव, बीड, लातूर आणि बुलढाणा या चार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रति लाभार्थी किमान ०.२० हेक्टर व कमाल एक हेक्टर क्षेत्रासाठी लाभ देय राहणार आहे. शासकीय बियाणे उत्पादक संस्थांकडून भुईमूगाचे २० किलो व ३० किलोचे तर तिळाचे ५०० ग्रॅम व एक किलोचे पाकिट स्वरूपात वितरण होणार आहे.

शेतकऱ्यांच्या क्षेत्रापेक्षा पॅकिंग प्रमाण अधिक झाल्यास त्याचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांना स्वतः भरावा लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी नोंदणी आवश्यक असून अर्ज महाडीबीटी प्रणालिवर प्रमाणित बियाणे वितरण या घटकातून सादर करायचा आहे. अर्जदारांची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेमुळे शेतकऱ्यांना सर्वात मोठा फायदा म्हणजे बियाण्याचा खर्च पूर्णपणे वाचणार आहे. आजच्या परिस्थितीत उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना १०० टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा सुरुवातीचा आर्थिक ताण मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. सुधारित आणि प्रमाणित बियाण्यांचा वापर केल्यास पिकाची उगवण चांगली होते, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे शेतकऱ्यांना शक्य होणार असून त्यांचे एकूण उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

याशिवाय, भुईमूग आणि तीळ ही दोन्ही पिके कमी पाण्यावर तग धरू शकणारी असल्यामुळे उन्हाळी हंगामात हा एक चांगला पर्यायी शेती व्यवसाय ठरू शकतो. पावसाच्या अनियमिततेमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही उत्पन्नाचा एक सकारात्मक स्रोत मिळणार आहे. वाढलेले उत्पादन बाजारात विकून शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकतो आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल. तसेच देशांतर्गत खाद्यतेल उत्पादनात वाढ झाल्यास आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लागणार आहे.