धुळे : जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या रेशीम उद्योग प्रकल्पातून शेतकऱ्यांना उल्लेखनीय यश मिळू लागले आहे. कृषी आधारित उपजीविका सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली असून रेशीम उत्पादनाकडे आता आशादायी व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे.

लुपिन ह्युमन वेल्फेअर अँड रिसर्च फाऊंडेशनने यासाठी पुढाकार घेतला आहे. धुळे व साक्री तालुक्यातील निवडक शेतकऱ्यांच्या शेतांवर तुती लागवड करण्यात आली तसेच रेशीम किट संगोपनासाठी आधुनिक संगोपनगृहे उभारण्यात आली. आवश्यक असलेल्या प्रशिक्षणातून तापमान नियंत्रण, वेळेवर खाद्य व्यवस्थापन, स्वच्छता, किटांची योग्य काळजी अशा सूक्ष्म बाबींवर भर दिला गेला. त्यामुळे तयार झालेले रेशीम कोष वजनदार आणि गुणवत्तापूर्ण ठरले. परिणामी बाजारात या कोषांना मोठी मागणी मिळत असून व्यापाऱ्यांकडून आकर्षक दराने खरेदी केली जात आहे.

रेशीम उद्योगासाठी येणारा एकदाचा खर्च प्रति एकर सुमारे दोन लाख पाच हजार रुपयांचा असून यामध्ये तुती लागवड रोपे, किट संगोपनगृह आणि ठिबक सिंचनचा समावेश आहे. एका बॅचसाठी साधारण विषय हजार रुपयांचा खर्च येतो. एका बॅचमध्ये सुमारे ७० किलो ‘ए’ दर्जाचे आणि १५ किलो इतर दर्जाचे कोष तयार होतात. सध्याचा बाजारभाव प्रतिकिलो ७२५ रुपये असल्यामुळे एका बॅचमधून सुमारे ५०, ७५० रुपयांचे उत्पन्न मिळते आणि निव्वळ नफा अंदाजे ३०,७५० रुपये होतो. वर्षाला चार बॅच घेतल्यास एकूण निव्वळ उत्पन्न सुमारे १,२३,००० रुपये मिळू शकते असा दावा यावेळी करण्यात आला.

बळसाणे (ता. साक्री) येथील शेतकरी सरदार खट्टा पाटील यांनी कानबाई माता शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत ६९ किलो उत्तम दर्जाचे रेशीम कोष विक्रीसाठी दिले. त्यांना प्रतिकिलो ७२५ रुपये असा दर मिळून सुमारे ५०,००० रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. या यशामध्ये बीड जिल्ह्यातील रेशीम उत्पादक प्रल्हाद चिंचकर यांचे विशेष मार्गदर्शन तसेच लुपिन फाऊंडेशनचे कृषितज्ज्ञ सदानंद चिंचकर, कुशावर्त पाटील, प्रशांत देसले, गौरव पाटील, रवींद्र देशमुख, नदीम शेख व संपूर्ण लुपिन टीमचे मोलाचे सहकार्य लाभले. जिल्हा रेशीम अधिकारी पोपटराव इंगळे यांनी वेळोवेळी महत्त्वपूर्ण माहिती देऊन या उद्योगात मोठे योगदान दिले अशी माहिती यावेळी देण्यात आली.

योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारा हा व्यवसाय ग्रामीण भागासाठी नवा पर्याय ठरत आहे. धुळे जिल्ह्यातील रेशीम उद्योग अबाधितपणे पुढे जाण्याची वाट यनिमित्त अनेकांना गवसली आहे. अपेक्षित उत्पन्न झक्याने भविष्यात यामध्ये आणखी अनेक शेतकरी सहभागी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रेशीम उद्योगामुळे परिसरातील रोजगार संधींनाही चालना मिळू लागली आहे. संगोपनगृहे, तुती शेती, किटांची निगा, कोष वेचणी आणि पॅकिंगसाठी स्थानिक मजुरांना काम मिळत असून अनेक कुटुंबांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. विशेषतः महिला आणि युवकांचा सहभाग वाढत असून त्यांनी प्रशिक्षण घेऊन स्वतः छोटे रेशीम युनिट सुरू करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता ग्रामविकासाचा एक प्रभावी माध्यम ठरत आहे.

आगामी काळात लुपिन फाऊंडेशनच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील आणखी गावांमध्ये हा उपक्रम राबवण्याची तयारी सुरू आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, नव्या संगोपनगृहे उभारणे तसेच उत्पादित रेशीमाला थेट मोठ्या बाजारपेठेशी जोडण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. यामुळे धुळे जिल्हा भविष्यात रेशीम उत्पादनासाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखला जाऊ लागेल, असा विश्वास तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

उच्च दर्जाचे रेशीम कोष उत्पादक शेतकरी

या उपक्रमात नवलनगर विभागातील देविदास पाटील (वणी), प्रवीण साळुंखे (सुखवड), प्रमोद पाटील (नावरी), सौ. माया पाटील (विश्वनाथ) तसेच साक्री तालुक्यातील निजामपूर विभागातील समाधान महाले (अमोडे), वैभव हालोरे (बळसाणे) आणि सरदार पाटील या शेतकऱ्यांनी पहिल्याच बॅचमध्ये उच्च दर्जाचे रेशीम कोष उत्पादन करून आदर्श निर्माण केला आहे.