धुळे : अन्न व औषध प्रशासन, धुळे कार्यालयाने शिरपूर शहर व परिसरात आज (दि.८) व्यापक तपासणी मोहीम राबवत विविध ठिकाणी कारवाई केली. विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या दोन खाद्य आस्थापना सील करण्यात आल्या.अन्न व औषध प्रशासनाने मारुती ट्रेडर्स ताडी विक्री केंद्र, प्लॉट क्रमांक ५, मच्छी बाजाराजवळ, शिरपूर येथे तपासणी केली. यावेळी ताडीचा अन्न नमुना प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी घेण्यात आला.
अंदाजे ११ हजार रुपये किमतीचा ताडीचा उर्वरित ११० लिटर साठा शिरपूर नगर परिषदेच्या कचरा निर्मूलन केंद्रात नष्ट करण्यात आला. याच मोहिमेदरम्यान नेहरू रोडवरील हरियाना जिलेबी सेंटर तसेच शिरपूर टोलनाक्याजवळील हॉटेल गुरुकृपा या दोन्ही आस्थापनांकडे वैध अन्न परवाना नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधितांना वैध अन्न परवाना घेतल्याशिवाय व्यवसाय करू नये, अशी नोटीस बजावण्यात आली आणि दोन्ही आस्थापना सील करण्याची कारवाई करण्यात आली.
याशिवाय हॉटेल बजरंग (बसस्थानकासमोर), यादगार रेस्टॉरंट (शिरपूर), हॉटेल पालवी (शिरपूर टोलनाक्याजवळ), हॉटेल उत्सव (मांडळ) आणि हॉटेल साहेबा (मांडळ) या पाच आस्थापनांचीही अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटींप्रकरणी संबंधित आस्थापनांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत एकूण नऊ प्रकरणांमध्ये एक लाख पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
संबंधित खाद्य व्यावसायिकांना नियमबाह्य पद्धतीचा वापर तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यांच्या विरोधात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अन्वये दंडात्मक कारवाईसाठी प्रकरणे दाखल करण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मोहिमेत अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, शशिकांत राणे आणि अरविंद राऊत यांनी सहभाग घेतला.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर अन्न सुरक्षेबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी विनापरवाना व्यवसाय, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ, भेसळ तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी सर्व विभागीय व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार धुळे जिल्ह्यातही नियमित तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे.
अन्न व्यवसायिकांनी वैध अन्न परवाना घेऊनच व्यवसाय करावा, स्वच्छता व अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करावे आणि ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड होईल अशी कोणतीही बाब आढळल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. पुढील काळात धुळे जिल्ह्यासह राज्यभर अशा तपासणी मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कायदेशीर कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
