धुळे : धुळे वनविभाग आणि गोल्डन अर्थ बायोप्रिझर्व्ह फाउंडेशन यांच्यात गवताळ परिसंस्थेचे संवर्धन व वन्यजीव संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे धुळे जिल्ह्यातील गवताळ प्रदेशांचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन, संशोधन आणि व्यवस्थापनाला नवी दिशा मिळणार आहे.
या कराराअंतर्गत विशेषतः भारतीय राखाडी लांडगा यांच्या संवर्धनावर भर देण्यात येणार आहे. त्याच्या अधिवासाचे संरक्षण, संख्येचे वैज्ञानिक मूल्यमापन तसेच हालचालींचे निरीक्षण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. याशिवाय, गवताळ परिसंस्थेतील इतर दुर्मिळ व संकटग्रस्त प्रजातींच्या संरक्षणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
धुळे जिल्ह्यात तृणभक्षी प्राण्यांची घटती संख्या ही लांडगा, बिबट आणि तरस यांसारख्या शिकारी प्राण्यांकडून पशुधनावर होणाऱ्या हल्ल्यांचे एक प्रमुख कारण ठरत आहे. या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी माळरानावर तृणभक्षी प्राण्यांच्या संख्यावाढीसाठी आवश्यक व पोषक गवताच्या प्रजातींचा प्रसार करण्यावर भर दिला जाणार आहे.
तसेच, माळरानावर वाढत असलेली भटक्या कुत्र्यांची संख्या ही गंभीर समस्या बनत असून, त्यामुळे लांडग्यांना अन्नासाठी स्पर्धा करावी लागत आहे. यामुळे लांडगा–कुत्रा संकर हा पर्यावरणीय धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वैज्ञानिक उपाययोजना व जनजागृती मोहिमा राबविण्यात येणार आहेत. माळरानावर वाढणारा कचरा हा भटक्या कुत्र्यांना आकर्षित करणारा मुख्य घटक असल्याने, कचऱ्यावर नियंत्रण व त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.
तसेच, कुक्कुटपालन व्यवसायातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे (मृत कोंबड्या) योग्य व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र कचरा व्यवस्थापन क्षेत्र निर्माण करण्याचे नियोजन आहे. करारात गवताळ भागातील आक्रमक वनस्पती जसे की प्रोसोपिस जुलीफ्लोरा आणि लँटाना कॅमारा यांचे निर्मूलन करून स्थानिक जैवविविधतेला चालना देण्यावर भर देण्यात आला आहे.
याशिवाय, तरस, खोकड आणि साळींदर यांसारख्या प्राण्यांच्या गुहांचे संरक्षण व दूरदृश्य प्रणालीद्वारे देखरेख करण्याचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी गावपातळीवर प्रबोधन, तसेच वन्यजीव संरक्षण समित्यांची स्थापना करून मानव व वन्यजीव सहजीवन वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
धुळे जिल्ह्याचे उपवनसंरक्षक मोहन नाईकवाडी यांनी सांगितले की, “हा करार धुळे जिल्ह्याच्या गवताळ प्रदेशांना दीर्घकालीन संरक्षण देण्यासाठी आणि स्थानिक जैवविविधतेचे जतन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.” गोल्डन अर्थ बायोप्रिझर्व्ह फाउंडेशनचे संचालक उमाकांत पाटील यांनी या करारामुळे वने व वन्यजीव संशोधन, संवर्धन आणि स्थानिक समुदायाच्या सहभागातून शाश्वत विकास साध्य होईल, असा विश्वास व्यक्त केला.
तर संचालक राज पाटील यांनी भविष्यात माळरान सफारी व निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक समुदायांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळेल, असे मत व्यक्त केले. या उपक्रमामुळे धुळे जिल्हा गवताळ परिसंस्था संवर्धनाचे आदर्श मॉडेल म्हणून विकसित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
