धुळे : येथील गुरुद्वाराचे धर्मगुरू बाबा धीरजसिंह यांच्यावर तलवारीने झालेल्या प्राणघात हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते, तथापि गुन्ह्यांची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता आता हा तपास आता ‘सीआयडी’ या तपासणी यंत्रणेकडे वर्ग करण्यात आला आहे. यामुळे विशेष पथकाने या प्रकरणाची सर्व कागदपत्रे आणि पुरावे ‘सीआयडी’ कडे हस्तांतरित केली आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
दरम्यान, धर्मगुरू बाबा धीरजसिंह यांचा मारेकरी आणि या हल्याच्या पाठीमागील संशयित व्यक्ती यांच्याबद्दल तीव्र संतापाची भावना पसरली आहे. यानंतर बाबा धीरजसिंह यांचा उत्तराधिकारी कोण आणि इच्छुक असलेले व्यक्ती यांच्याबद्दलही गेल्या आठवड्यात चांगलाच खल झाला.यासाठी दिवंगत बाबा धीरजसिंह यांचे कुटुंबीय आणि महत्वाच्या व्यक्ती धुळ्यात आल्या होत्या. स्थानिक आणि बाहेरून आलेले अशा दोघांत वाद- प्रतिवाद झाले. यासाठी पोलिसांना मोठा बंदोबस्त ठेवावा लागला. अखेर दोन्ही गटांकडूनदिवंगत बाबा धीरजसिंह याचा उतराधिकारी म्हणून एकाचवेळी दोन जणांची नावे घोषित करण्यात आली आणि तूर्ततरी हा वाद काहीसा कमी झाल्याचा दावा करण्यात येतो आहे.
या घटनेची पार्श्वभूमी
शहरातील मुंबई–आग्रा रोडवरील गुरुद्वाराजवळील लंगर हॉलच्या बाहेर दि. १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास थरारक घटना घडली. गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरजसिंग पुरणसिंग खालसा यांच्यावर उमेश कैलास माळोदे (२४, रा. आडगाव, नाशिक) याने अचानक तलवारीने प्राणघातक हल्ला केला आणि त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी बाबांना वाचविण्यासाठी धावलेल्या रणविरसिंग सुखदेवसिंग खालसा आणि सुखविंदरसिंग उर्फ बग्गा हरप्रीतसिंग संधु यांच्यावरही उमेश माळोदे याने तलवारीने वार करून दोघांना जखमी केले. गुरुद्वाराच्या लंगर हॉलच्या बाहेरच ही भयानक घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या बाबा धीरजसिंग यांना तातडीने शहरातील सिद्धेश्वर या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आणि प्राथमिक उपचार सुरु करण्यात आले.
तलवारीने त्यांच्या डोके व मानेवर जोरदार वार झाल्याने बाबा धीरजसिंह यांचा मेंदू गंभीरपणे दुखावलागेला आहे. यामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्यापासूनच बाबा धीरजसिंह यांची प्रकृती चिंताजनक झाली. स्थानिक निष्णात डॉक्टरांनी त्यांच्यावर आवश्यक ते प्रथोमोपचार आणि जोखमीचे निर्णयही लागलीच घेतले, तथापी गेल्या दोन दिवसात उपचार करणाऱ्या डॉक्टरांना बाबा धीरजसिंह यांच्या प्रकृतीत हवी तेवढी सुधारणा दिसून आली नसल्याने अखेर त्यांना तातडीने मुंबईकडे रवाना करण्याचा निर्णय बाबांशी संबंधितांनी घेतला. दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारस बाबा धीरजसिंह यांना खास ‘एअर ऍम्ब्युलन्स’ने मुंबईकडे हलविण्यात आले आणि कोकीलाबेन अंबानी या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचार सुरु असतानाच बाबा धीरजसिंह यांचे निधन झाल्याची बातमी ९ डिसेंबर रोजी सकाळी धुळ्यात धडकली आणि दि. १० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी गुरुद्वारा आवारातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.
