धुळे : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व पानमसाल्याच्या अवैध वाहतुकीवर अन्न व औषध प्रशासन आणि सांगवी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत १९ लाख १९ हजार रुपयांचा साठा जप्त केला. हाडाखेड तपासणी नाक्यावर आयशर मालवाहू वाहनाची तपासणी केली असता राजश्री पानमसाला, गुटखा व तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. या प्रकरणी मध्यप्रदेशातील वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, आयशर कंपनीचे एमपी-०७ जीबी-१६१८ क्रमांकाचे वाहन महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व पानमसाल्याची वाहतूक करीत आहे. या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह हाडाखेड तपासणी नाका, सांगवी (ता. शिरपूर) येथे २६ सप्टेंबर २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. संशयित वाहन अडवून पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून महाराष्ट्रात विक्री व साठवणुकीस प्रतिबंधित असलेला राजश्री पानमसाला, गुटखा व तंबाखूचा साठा आढळून आला. अधिकाऱ्यांनी केलेल्या मोजणीनुसार वाहनात एकूण ११ हजार ६०० पॅकेट प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळले. या साठ्याची एकूण किंमत १९ लाख १९ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी वाहनचालक संजयकुमार किशोरीलाल गुप्ता (रा. रेती फाटक, लोहामंडी, ग्वालियर, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलिस ठाणे, सांगवी येथे संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जप्त केलेला प्रतिबंधित साठा आणि वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. ही संयुक्त कारवाई अन्न व औषध प्रशासन, धुळे आणि शिरपूर तालुका पोलिस ठाणे, सांगवी यांच्या पथकाने केली. कारवाईत अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त मंगेश माने (नाशिक), सहाय्यक आयुक्त (अन्न) गोपाल माहोरे, अन्न सुरक्षा अधिकारी शशिकांत राणे तसेच अरविंद राऊत आणि मंगेश भावसार यांनी सहभाग घेतला. पोलिस विभागाकडून पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, पोलिस उपनिरीक्षक हेमंत खैरनार, पोलिस उपनिरीक्षक मिलिंद पवार तसेच संदीप ठाकरे, राकेश मोरे आणि स्वप्नील बांगर यांनी कारवाईत सहभाग घेतला. महाराष्ट्रात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची राज्याबाहेरून होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी तपासणी नाक्यांवरील कारवाया अधिक प्रभावी करण्यात येत असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संबंधित यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे.

तस्करांच्या केंद्रस्थानी धुळे जिल्हा
यापूर्वीही धुळे जिल्ह्यातील गुजरात व मध्यप्रदेश सीमेलगतच्या तपासणी नाक्यांवर प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक उघडकीस आणणाऱ्या अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. राज्यात प्रतिबंध असतानाही मोठ्या प्रमाणावर बाहेरील राज्यांतून अशा पदार्थांची तस्करी करण्याचे प्रकार सातत्याने समोर येत असल्याने सीमावर्ती भागातील तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे. हाडाखेड तपासणी नाका हा अशा कारवायांच्या दृष्टीने महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. दरम्यान, प्रतिबंधित गुटखा, पानमसाला किंवा तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, वाहतूक अथवा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. संशयास्पद वाहतूक किंवा विक्रीची माहिती नागरिकांनी संबंधित पोलिस ठाणे किंवा अन्न व औषध प्रशासनाला तत्काळ द्यावी, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
