धुळे : कधीकाळी ’शाप’ म्हणून ज्या आजाराकडे पाहिले जायचे ते आजार कधीच जवळपास संपुष्टात आला आहे.असे असले तरी शून्य प्रसाराचे लक्ष्य साध्य करण्यासाठी पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणा मोठ्या नेटाने कामाला लागली आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य सेवा विभागामार्फत धुळे जिल्ह्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा उद्देश जिल्ह्यातील कुष्ठरोगाचे प्रमाण कमी करून सन २०२७ पर्यंत शून्य प्रसाराचे लक्ष्य साध्य करणे हा आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दिली.
या मोहिमेत समाजातील निदान न झालेले रुग्ण शोधणे, नव्या सांसर्गिक रुग्णांना त्वरित बहुविध औषधोपचार उपलब्ध करून देणे आणि संसर्गाची साखळी खंडित करणे यावर भर दिला जाणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील ३,७५,५१२ घरे आणि १९,५५,३८६ नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी १,३७६ सर्वेक्षण पथके नियुक्त करण्यात आली असून प्रत्येक पथकात प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी सहभागी असतील. हे अभियान घराघरात सर्वेक्षणाद्वारे राबविले जाणार आहे.
तपासणीदरम्यान आशा कार्यकर्त्या महिला सभासदांची तपासणी करतील, तर पुरुष स्वयंसेवक पुरुष सभासदांची तपासणी करतील. सर्वेक्षणात संशयित रुग्ण आढळल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रातील तसेच जिल्हास्तरावरील वैद्यकीय अधिकारी तपासणी करतील आणि निदान निश्चित झाल्यानंतर तात्काळ औषधोपचार सुरू केले जातील. कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणे म्हणजे त्वचेवर फिकट किंवा लालसर चट्टे दिसणे, त्वचेचा बधीरपणा, घाम येणे बंद होणे, त्वचा जाड किंवा चकचकीत होणे, कानाची पाळी जाड होणे, डोळे पूर्ण बंद न होणे, हात-पाय बधीर होणे, बोटे वाकडी होणे, हातातून वस्तू पडणे, पायातून चप्पल गळून पडणे इत्यादी आहेत. ही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अभियानादरम्यान विविध जनजागृती उपक्रम राबविले जातील. यामध्ये स्थानिक वृत्तपत्रांतून माहिती प्रसिद्ध करणे, ध्वनिक्षेपक प्रचार, रॅली, हस्तपत्रिका वाटप, पोस्टर्स आणि बॅनर्सद्वारे जागृती करण्यात येईल तसेच शाळा, ग्रामपंचायत व नगरपरिषदेच्या माध्यमातून नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, सहायक संचालक डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. तरन्नुम पटेल आणि कुष्ठरोग वैद्यकीय अधिकारी यांनी ही मोहीम सुरू करण्यासाठीची तयारी केली आहे.
नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, आरोग्य पथकांना सहकार्य करावे आणि कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने योगदान द्यावे. या मोहिमेमुळे धुळे जिल्ह्यात कुष्ठरोग नियंत्रणाला गती मिळणार असून आरोग्य विभागाचे “शून्य कुष्ठरोग प्रसाराचे” लक्ष्य साध्य करण्याकडे एक महत्त्वाचे पाऊल टाकले जाईल असे आवाहन यानिमित्त करण्यात आले आहे.
