धुळे : धुळे जिल्ह्यात मधुमेह रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक बनली असून एक जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान झालेल्या तीन लाख आठ हजार ८४२ नागरिकांची तपासणीत १७ हजार २९६ नागरिक मधुमेहग्रस्त असल्याचे निदान झाले आहे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे लवकर तपासणी, प्रतिबंध आणि सतत उपचाराचे महत्त्व अधोरेखित होत आहे. राज्यभर सार्वजनिक आरोग्य विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेत धुळे जिल्ह्याने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण महाराष्ट्रात या दहा महिन्यांत एक कोटी ५० लाख ७९ हजार ८५२ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून २८ लाख ५५ हजार ७०९ लोकांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दिली. सरकारी रुग्णालयांमध्ये मधुमेह तपासणी व उपचार मोफत उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांनी या सेवांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे.
१४ नोव्हेंबर २०२५ रोजी जागतिक मधुमेह दिनानिमित्त राज्यभर जनजागृती उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेले “आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मधुमेह” हे घोषवाक्य विशेष लक्षवेधी ठरले आहे. बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणत्याही वयोगटात मधुमेहाचा धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव करून देणे हा या वर्षीच्या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश आहे.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आरोग्य शिबिरे, मार्गदर्शन परिषदा, मोफत स्क्रिनिंग, जनजागृती रॅली आणि व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. नागरिकांना नियमित तपासणी करून घेणे, उपचारात सातत्य ठेवणे आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, असंतुलित आहार, ताणतणाव, व्यायामाचा अभाव, जंकफूडचे वाढते सेवन आणि आधुनिक जीवनशैलीमुळे मधुमेहाचे प्रमाण जलदगतीने वाढत आहे. नियमित व्यायाम, सकस आहार, पुरेशी झोप आणि तणाव नियंत्रण यांचा अवलंब केल्यास मधुमेहावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येते. एकदा मधुमेह झाल्यास आयुष्यभर काळजी आवश्यक असते. त्यामुळे सुरुवातीपासूनच आरोग्यदायी सवयी अंगीकारणे, वेळोवेळी तपासणी करणे आणि उपचारात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. जागतिक मधुमेह दिनाचे उपक्रम नागरिकांमध्ये जागरूकता वाढवून प्रतिबंधात्मक व आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहन देणार आहेत.
