जळगाव : धुळे–जळगाव दरम्यान थेट रेल्वे संपर्क प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने नरडाणा स्थानकाजवळ बायपास मार्ग उभारण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव पुढे आला असून, यामुळे खान्देशच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामश्रय पांडे यांच्यासोबत नुकतीच अमळनेरमध्ये प्रवासी सुविधांसह प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत सविस्तर चर्चा केली.
पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामश्रय पांडे अमळनेर रेल्वे स्थानकाला भेट देत ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत स्थानक परिसराचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच अमळनेर रेल्वे स्थानकाचा वाढता प्रवासी प्रतिसाद लक्षात घेता स्थानकावर आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. प्रवाशांसाठी प्रतीक्षालयांची उभारणी, स्वच्छतागृहांची सुधारणा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था, पार्किंग क्षेत्राचा विस्तार, प्रकाशयोजना आणि सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. स्थानक परिसराचे सुशोभीकरण करून रेल्वे प्रवाशांना अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी प्रशासनाकडून विविध कामे वेगाने सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी खासदार स्मिता वाघ यांनी अमळनेर रेल्वे स्थानकावर अधिकाधिक एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी प्रशासनाकडे केली. खान्देशातील प्रवाशांना मुंबई, पुणे, सुरत, अहमदाबाद तसेच मध्य भारतातील शहरांशी अधिक वेगवान संपर्क मिळण्यासाठी रेल्वे सुविधा वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक महत्त्वाच्या गाड्यांना अमळनेर येथे थांबा नसल्यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. व्यापारी, शेतकरी आणि लघुउद्योगांसाठी महत्त्वाची असलेली पार्सल सेवा दीर्घकाळापासून बंद असल्याने स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर पार्सल सेवा तातडीने पुन्हा सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा झाली. पार्सल सेवा सुरू झाल्यास अन्नधान्य, भाजीपाला, फळे तसेच विविध औद्योगिक वस्तूंची वाहतूक सुलभ होणार असून स्थानिक व्यापाराला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
मुंबई–पुणे रेल्वेला पर्यायी मार्ग
पाहणी दौऱ्यादरम्यान नरडाणा–धुळे रेल्वेमार्गाच्या कामासंदर्भात नरडाणा येथे रेल्वे बायपास उभारण्याचा महत्त्वपूर्ण मुद्दाही उपस्थित करण्यात आला. सध्या धुळे आणि जळगाव यांच्यात थेट रेल्वे संपर्क नसल्याने प्रवाशांना व माल वाहतुकीला मोठा वळसा घालावा लागतो. प्रस्तावित बायपास मार्गामुळे धुळे–जळगाव दरम्यान थेट रेल्वे संपर्क निर्माण होऊन वाहतूक अधिक जलद व सुलभ होण्याची अपेक्षा आहे. यामुळे खान्देशातील औद्योगिक, शैक्षणिक आणि व्यापारी क्षेत्राला मोठी चालना मिळू शकते. भविष्यात मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरील ताण कमी करण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होऊ शकते, असेही खासदार वाघ यांनी नमूद केले. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे नेटवर्कला जोडणारा हा मार्ग भविष्यात माल वाहतुकीसाठी महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील कृषी व औद्योगिक उत्पादनांची देशाच्या विविध भागांमध्ये जलद वाहतूक करण्यासाठी या मार्गाचा फायदा होणार आहे. नव्या रेल्वे विकासामुळे खान्देशच्या आर्थिक प्रगतीला गती मिळेल, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.
