धुळे : आज आमचा लकी डे आहे. आमच्या आईसाहेबांनी अर्ज भरला आणि त्याचवेळी बिहारमध्ये महायुतीची सत्ता स्थापन झाली. त्यामुळे महाराष्ट्रातही आमचे यश निश्चित आहे.दोंडाईचा नगरपरिषद निवडणुकीत २७ पैकी २६ जागांवर विजय निश्चित असल्याचा ठाम दावा राज्याचे पर्यटन आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

बिहार विधानसभेच्या निकालांमध्ये मिळालेल्या महायुतीच्या अभूतपूर्व यशाचा नंतर पालक मंत्री जयकुमार रावल यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. बिहार निवडणूक निकालाचा प्रभाव आता महाराष्ट्रातही उमटेल, असा ठाम विश्वास व्यक्त करत ते म्हणाले, बिहारपासून कश्मीर, कन्याकुमारी ते गुजरात-आसामपर्यंत भारतीय जनता पक्षाचा विजयाचा दणदणाट सुरू असताना महाराष्ट्रातील आगामी नगरपरिषद निवडणुकांमध्येही महायुतीला प्रचंड यश मिळेल.

कधीकाळी उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता; मात्र गेल्या काही वर्षांत भाजपाने विकासकार्यात सातत्य राखून सर्वसामान्यांचा विश्वास जिंकला आहे. त्यामुळे आता उत्तर महाराष्ट्र हा भाजपाचा बालेकिल्ला ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा, रस्ते-विकास, जलसंधारण, पाणीपुरवठा आणि विविध कल्याणकारी योजना वेगाने राबविण्यात आल्या. याच विकासाच्या बळावर धुळे जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांवर शतप्रतिशत विजय मिळवू, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

दोंडाईचा नगरपरिषदेबाबत बोलताना रावल यांनी सांगितले की, महायुतीच्या शासनकाळात दोंडाईचा शहरात राबविण्यात आलेल्या विकास प्रकल्पांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. नागरिकांनी महायुतीच्या कामांवर समाधान व्यक्त केले असून, शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते आणि पाणीपुरवठा प्रकल्पांमुळे विकास वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे दोंडाईचा नगरपरिषद निवडणुकीत २७ पैकी २६ जागांवर विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी रावल यांनी हलक्याफुलक्या शब्दांत म्हटले की, “आज आमचा लकी डे आहे. आमच्या आईसाहेबांनी अर्ज भरला आणि त्याचवेळी बिहारमध्ये महायुतीची सत्ता स्थापन झाली. त्यामुळे महाराष्ट्रातही आमचे यश निश्चित आहे.” बिहारमधील निकालानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये मोठा उत्साह असून त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील निवडणुकांवर दिसून येईल, असे त्यांनी नमूद केले.

राज्यातील मतदार विकास, सुशासन, पारदर्शक निर्णयप्रक्रिया आणि स्थिर नेतृत्वाला प्राधान्य देत आहेत. आगामी निवडणुकांमध्येही हेच मुद्दे निर्णायक ठरणार असून महायुतीद्वारे राबविण्यात आलेल्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्याने त्यांचा समर्थनाचा ओघ वाढत असल्याचे रावल यांनी सांगितले. बिहारचा निकाल हा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील वाढत्या प्रभावाचा पुरावा असून, महाराष्ट्रातील निवडणुकांतही याचा सकारात्मक परिणाम होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.