धुळे : धुळे तालुक्यात अपघात तसेच बिबट्यासह हिंस्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या १८ पाळीव पशूंसाठी राज्य शासनाने नुकसानभरपाई मंजूर केली आहे. १४ पशुपालकांना एकूण ५ लाख १६ हजार ५०० रुपयांचे अनुदान देण्यास मंजुरी मिळाली असून ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या प्रकरणी आमदार राम भदाणे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले.

ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आणि पशुपालकांची उपजीविका शेतीबरोबरच दुग्धव्यवसाय व पशुपालनावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत अपघात, वन्यप्राण्यांचे हल्ले किंवा अन्य नैसर्गिक कारणांमुळे जनावरे दगावल्यास संबंधित कुटुंबाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होतो. अशा नुकसानीची तीव्रता लक्षात घेऊन शासनाने विविध मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. त्यानुसार जनावरांचा मृत्यू झाल्यानंतर तातडीने संबंधित विभागाला माहिती देणे, महसूल व पशुसंवर्धन विभागामार्फत पंचनामा करणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे आणि त्यानंतर प्रस्ताव शासनाकडे पाठविणे, अशी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. प्रस्तावाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून निर्धारित निकषांनुसार आर्थिक मदत मंजूर केली जाते.

गेल्या काही महिन्यांत धुळे तालुक्यातील विविध गावांमध्ये बिबट्यासह हिंस्र श्वापदांच्या हल्ल्यात तसेच वाहनांच्या धडकेत १८ पाळीव जनावरांचा मृत्यू झाला होता. या घटनांमुळे पशुपालकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. नुकसानभरपाई मिळावी, यासाठी बाधित पशुपालकांनी आमदार राम भदाणे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी पशुसंवर्धन विभाग व महसूल प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यास तसेच प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यासाठी प्रयत्न केले. या पाठपुराव्यानंतर संबंधित प्रस्तावांना मंजुरी मिळाली. शासनाकडून मंजूर करण्यात आलेली मदत ही पशुपालकांना दिलासा देणारी ठरणार आहे.

जनावरे ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून त्यांचा मृत्यू झाल्यास दूध उत्पादन, शेतीची कामे आणि कुटुंबाचे नियमित उत्पन्न यावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत पूर्ण नुकसान भरून काढणारी नसली, तरी नव्याने पशुधन उभारण्यासाठी आणि आर्थिक अडचणीतून काही प्रमाणात सावरण्यासाठी ती उपयुक्त ठरत असल्याचे पशुपालकांकडून सांगितले जाते. मंजूर लाभार्थ्यांमध्ये संतोष रामा ठेलारी (आनंदखेडे) यांना तीन मेंढ्यांसाठी १२ हजार रुपये, रामभाऊ त्र्यंबक जाधव (नाणे), रविंद्र पुंजाराम नरकर (नाणे), शांताराम वाल्हा मराठे (वेल्हाणे), विनायक बळीराम पाटील (नावरा), अशोक सखाराम सूर्यवंशी (नावरा), समाधान शिवाजी पाटील (शिरडाणे प्र. डां.), समाधान दुर्योधन बेलदार (तिखी), आनंदसिंग रविंद्रसिंग राजपूत (बाबरे), गणेश वामन पाटील (धामणगाव) आणि भास्कर मुकुंदा पाटील (खोरदड) यांना प्रत्येकी ३७ हजार ५०० रुपये मंजूर झाले आहेत.

रत्नाबाई बाबुलाल पाटील (शिंदे), वणी बु. यांना एक गाय व एक पारडू यासाठी ५७ हजार ५०० रुपये, प्रमोद शंकर पाटील (निमगुळ) यांना एका बैलासाठी ३२ हजार रुपये, तर काशिनाथ बाजीराव पाटील (शिरूड) यांना दोन पारड्यांसाठी ४० हजार रुपये मंजूर झाले आहेत. पशुपालकांनी जनावरांचा मृत्यू झाल्यास तातडीने संबंधित ग्रामपंचायत, महसूल विभाग, वन विभाग (वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या प्रकरणात) किंवा पशुसंवर्धन विभागाला माहिती देऊन वेळेत पंचनामा करून घेणे आवश्यक आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वेळेत प्रस्ताव सादर केल्यास आर्थिक मदत मिळण्याची प्रक्रिया सुलभ होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.