धुळे : साक्री तालुक्यातील मैंदाणे येथील श्री बालाजी हॉटेल राजस्थानी दालबाटी ढाब्याजवळ सुरू असलेल्या एलपीजी गॅसच्या अवैध रिफिलिंग रॅकेटवर महसूल व पुरवठा विभागाने मध्यरात्री धाड टाकून तब्बल ८३ लाख ३५ हजार ७४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, इतर आरोपी अंधार व मुसळधार पावसाचा फायदा घेऊन पसार झाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सात जुलै रोजी रात्री सुमारे ११ वाजता अपर तहसीलदार अधिकार पेंढारकर, पुरवठा निरीक्षक विशाल कांगणे, पुरवठा निरीक्षक छोटू महादू पाटील, भारत बापू देसले, जयवंत निळकंठ पाटील, गणेश माळी व सुभाष परशराम गिरी या महसूल विभागाच्या पथकाने पंचांसह मैंदाणे येथील श्री बालाजी हॉटेल राजस्थानी दालबाटी ढाबा परिसरात छापा टाकला. ही माहिती काल (दि.९) रात्री उशिरा अधिकृतपणे देण्यात आली. घटनास्थळी भारत पेट्रोलियमचा अशोक लेलंड कंपनीचा एलपीजी टँकर (क्रमांक केए-०१-एई-६३६५) उभा होता. या टँकरच्या व्हॉल्व्हला रबरी पाईप व सहा तोंडी नोझल जोडून १९ किलो क्षमतेच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरला जात असल्याचे निदर्शनास आले.

महाराष्ट्र, गुजरातमध्ये गॅसचा काळाबाजार?

अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेताच तेथे उपस्थित असलेले बहुतांश संशयित पसार झाले. मात्र भरत चौधरी (रा. धुळे) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने पारस जैन (रा. दहिवेल), महारू चंदू ठाकरे उर्फ गोपी (रा. मैंदाणे), मनिषभाई व विक्की बारडोली यांच्या साथीने हा अवैध व्यवसाय चालवत असल्याची माहिती दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. टँकरमधून गॅस भरून तो महाराष्ट्रासह गुजरात राज्यात विक्रीसाठी पाठविला जात असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.

१७ व्यावसायिक गॅस सिलेंडर आढळले

कारवाईदरम्यान घटनास्थळावर सहा भरलेले व अकरा रिकामे असे एकूण १७ व्यावसायिक गॅस सिलेंडर, सुपर कॅरी वाहन, दोन बोलेरो पिकअप वाहने, एलपीजीने भरलेला टँकर, सहा तोंडी नोझल, प्लास्टिकचा पाईप, गॅस फिटिंगचा पाना तसेच एक मोबाईल असा एकूण ८३ लाख ३५ हजार ७४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. टँकरमध्ये सुमारे १७.४० मेट्रिक टन एलपीजी गॅस असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

टँकरमधून थेट व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस…

प्राथमिक तपासात ही कारवाई केवळ बेकायदेशीर गॅस साठवणुकीपुरती मर्यादित नसून, एलपीजी टँकरमधून थेट व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचा अत्यंत धोकादायक प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. अशा पद्धतीने गॅस भरणे कोणत्याही क्षणी भीषण स्फोट किंवा आग लागण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितासह मालमत्तेलाही गंभीर धोका निर्माण झाला होता, असे प्रशासनाने नमूद केले आहे. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून, या अवैध रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही सखोल तपास सुरू आहे.

टँकर मालक, चालकासह अन्य संशयितांवर कारवाई

या प्रकरणी टँकरचे मालक पी. नटराजन पलानीसामी, संबंधित वाहनांचे मालक व चालक तसेच भरत चौधरी, पारस जैन, महारू चंदू ठाकरे (गोपी), मनिषभाई बारडोली आणि इतर संबंधितांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.