धुळे : राज्यात महायुतीची सत्ता, धुळ्यात काय? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच राहिल्याने महायुतीतल्याच मित्र पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आजतरी स्वतंत्र राजकीय चूल मांडली आहे. यामुळे येथील महानगर पालिकेची आगामी निवडणूक अधिक चुरशीची होईल असे दिसते आहे.

खरेतर आरक्षण सोडत जाहीर होण्याच्या आधीच महापालिकेच्या निवडणुकीची उत्सुकता लागून असलेल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या परीने जनसंपर्क वाढविला आणि महापालिकेच्या निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर होताच पक्ष प्रमुख अधिक सक्रिय झाले. शहरातील राजकीय धुरंधर म्हटले जाणारे भाजपचे आमदार अनुप अग्रवाल आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेले माजी आमदार फारुक शहा यांच्यातला राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता, धुळ्यात काय? हा प्रश्न अधिक चर्चेत आला आहे.

राज्यात मित्रपक्ष म्हणून सत्तेत असले तरी धुळ्यात या आजी माजी आमदारांची मैत्री होईल का याबद्दल अनेकांमध्ये साशंकता आहे. या सगळ्याच घटनांच्या अनुषंगाने स्थानिक राजकीय पटलावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार गट आणि शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्याही गोटात सध्या संभ्रमाचे वातावरण दिसते आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे खास सुकानी समिती निर्माण करण्यात आली असून या समितीचे अध्यक्षपद माजी आमदार फारुक शाह यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.या समितीत माजी आमदार शरद पाटील यांच्यासह शहरात प्रभाव असलेले अन्य नेते आहेत.

भाजपाने विधानसभा निवडणुकीत धार्मिक मुद्दे पुढे केल्याने साहजिकच प्रभाव असलेला भाग अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीनेही संधी सोडलेली नाही. माजी आमदार शहा यांना समितीचे पद देऊन त्यांच्या नेतृत्वाला महत्व देणे हा त्याचाच एक भाग आहे. शहा हे त्यांच्या प्रभावाखालील भागातून पक्षाला बळकटी मिळवून देऊ शकतील अशी तजवीज पक्ष नेत्यांनी केली आहे.

शिवसेना शिंदे गटाची अवस्था आणखीनच पाहण्यासारखी आहे. या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी धुळ्यासाठी दिलेले तीन – तीन जिल्हाध्यक्ष आणि या सर्वांचेच मुख्यालय धुळे शहर आहे. यामुळे धुळे शहरात नेमक्या कोणत्या जिल्हाध्यक्षांचा किती प्रभाव हे पाहिले जाणार आहे. पैकी जिल्हाध्यक्ष सतीश महाले यांनी शिरपूर आणि धुळे शहरातून शेकडो प्रवेश घडवून आणले आहेत. ते स्वतः नगरसेवक आणि महापालिकेत स्थायी सभापती राहिले आहेत. महाले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेले पॅनल निवडून आणण्याचे कसब महाले यांनी यापूर्वीच दाखवून दिले आहे.

मूळ शिवसेनेत फूट पडल्यावर एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणारा राज्यातला पहिला समर्थक म्हणून सतीश महाले यांची ओळख आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टोकाची टीका होत असताना महाले यांनी स्थानिक विरोधकांशी दोन हात केले. ही पार्श्वभूमी प्रस्थापित भाजप नेत्यांनाही ठाऊक असल्यामुळे साहजिकच महाले यांच्या राजकीय चालीचा विचार साऱ्यांनाच करावा लागणार आहे. तथापि, महापालिका निवडणूक त्यांनी पक्षादेशाच्या निर्णयावर ठेवली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीबाबत विविध घडामोडींवर शक्य तसा तर्क काढण्यात येतो आहे.

मागील मनपा निवडणुकीत भाजपने ५० प्लसचा नारा देत ५१ नगरसेवक निवडून आणले आणि महापालिकेवर पहिल्यांदा बहुमताने सत्ता स्थापन केली. काँग्रेस, राष्ट्रवादीला १४ जागांवर समाधान मानावे लागले होते. एमआयएमचे ४ नगरसेवक निवडून आले होते. महापालिका अस्तित्वात आल्यावर प्रथम महापौर देणार्‍या शिवसेनेने केवळ एक जागा मिळवून महापालिकेत प्रवेश केला होता.