धुळे : बहुप्रतिक्षित मनमाड–इंदूर रेल्वे मार्ग तसेच बोरविहीर–नरडाणा रेल्वे प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रियेबाबत स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जयेश बाफना यांनी खाजगी पातळीवर माहिती संकलन उपक्रम सुरू केला आहे.
या महत्वाकांक्षी आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे सर्वार्थाने भाग्य उजळवू शकणाऱ्या प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या जमीनधारकांची वास्तविक परिस्थिती, अडचणी, अपेक्षा आणि भूमिका यांचा सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांकडून थेट अभिप्राय नोंदवून तो वस्तुनिष्ठ आणि तटस्थ पद्धतीने विश्लेषित केला जाऊ शकेल. संकलित माहितीचे अभ्यासपूर्ण परीक्षण करून संबंधित शासन, रेल्वे प्रशासन व जिल्हा प्रशासनासमोर तथ्याधारित व संरचित मांडणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अधिग्रहण प्रक्रिया पारदर्शक, कायदेशीर आणि संवेदनशील पद्धतीने पार पडावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रकल्पामुळे काही भागांत शेती, निवासस्थान किंवा उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने नागरिकांमध्ये विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. भरपाईचे निकष, पुनर्वसनाची तरतूद, पर्यायी जमीन किंवा रोजगाराच्या संधी याबाबत स्पष्टता मिळावी, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी काही नागरिकांनी प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य विकासकामांबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे. मनमाड–इंदूर रेल्वे मार्ग हा उत्तर महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांना जोडणारा महत्त्वाचा दळणवळण दुवा ठरणार असल्याने या प्रकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक जनभावना समजून घेत प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.
दरम्यान, या माहिती संकलन उपक्रमात नागरिकांना आपली भूमिका स्पष्टपणे मांडण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते जयेश बाफना यांच्यातर्फे करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने जमीन अधिग्रहणाबाबत अधिकृत नोटीस प्राप्त झाली आहे का, भरपाई निर्धारणाची सद्यस्थिती काय आहे, पहिला हप्ता मिळाला आहे का, तसेच पुनर्वसनाबाबत कोणत्या अपेक्षा आहेत, यासंदर्भातील माहिती नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे प्रशासनास वस्तुस्थितीचे स्पष्ट चित्र समोर येण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रकल्पामुळे दीर्घकालीन विकास, औद्योगिक गुंतवणूक व रोजगारनिर्मितीच्या संधी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी जमीन गमावणाऱ्या शेतकऱ्यांच्या न्याय्य भरपाई व सन्मानपूर्वक पुनर्वसनाचा मुद्दा तितकाच महत्त्वाचा असल्याचे मत पुढे येत आहे. त्यामुळे विकास आणि स्थानिकांच्या हितसंबंध यामध्ये संतुलन राखत निर्णय व्हावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा व्यक्त होत आहे. यापार्श्वभूमीवर बाफना यांनी सुरु केलेला माहिती संकलनाच्या उपक्रमाला काहीसे महत्व येऊ शकेल असे म्हटले जाते आहे.
वस्तुस्थिती समोर येऊ शकेल
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते जयेश बाफना म्हणाले, “खरेतर या प्रकल्पाबाबत ठोसपणे आपले म्हणणे मांडण्यासाठी कोणीही पुढे येताना दिसत नाही. संघटितपणे पुढे येणाऱ्यांपैकी एखाद्याला वैयक्तिक पातळीवर आपली भूमिका सविस्तरपणे मांडणे अनेकदा शक्य होत नाही. अशा शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या भावना या उपक्रमाच्या माध्यमातून व्यक्त होऊ शकतील. त्यामुळे वस्तुस्थितीचा किमान अंदाज घेणे शक्य होईल. तसेच प्रशासन, राज्यकर्ते आणि प्रत्यक्ष लाभक्षेत्रातील घटक यांच्यात सुवर्णमध्य साधणेही अधिक सोयीस्कर ठरेल.”
