धुळे : माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन झाल्याची बातमी धुळ्यात धडकल्यावर विविध स्तरातून शोक व्यक्त झाला. राज्याचे पणन, राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार रावल यांनीही आपला शोकसंदेश दिला आहे.
मंत्री रावल यांच्या नावे असलेल्या “फेसबुक वॉल” वरील मजकूर असा, ‘धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री स्व. स्वरुपसिंगजी नाईक यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने डोंगरदऱ्यातील सर्वसामान्य जनतेसाठी आयुष्यभर लढणारा एक लोकनेता हरपला. स्व. नाईकसाहेबांनी धुळे -नंदुरबार जिल्ह्याचे प्रदीर्घकाळ प्रभावी नेतृत्व केले. आदिवासी विकासमंत्री पदासह अनेक महत्त्वाची मंत्रिपदे त्यांनी अत्यंत कुशलतेने सांभाळली. सलग आठ वेळा विधानसभेवर निवडून येऊन त्यांनी जनतेचा विश्वास संपादित केला. आमचे आजोबा परमश्रद्धेय दादासाहेब रावल यांच्याशी त्यांचे घनिष्ठ व जिव्हाळ्याचे संबंध होते. आणि हेच संबंध त्यांनी पुढील पिढीशीही आत्मीयतेने जपले. स्व. स्वरुपसिंगजी नाईक यांच्या निधनाने नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो हीच प्रार्थना. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांनी बुधवारी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नवापूर येथे त्यांचे निधन झाले. महाराष्ट्राच्या मंत्रिमडंळात अनेक खात्यांचे मंत्रीपद त्यांनी भूषविले होते. आपले जुने सहकारी दिवंगत माणिकराव गावित यांच्याबरोबर सुरुपसिंग यांनी आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून नवापूर तालुक्यात शिक्षण संस्थेचे जाळे विणले. आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे येथे सुरु केला. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या अनेक योजना आणि विकास कांमामध्ये त्यांचा महत्वाचा आणि मोलाचा वाटा आहे. त्यांच्या पश्चात दोन पत्नी, दोन मुली , पाच मुलगे, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे. त्यांचे पुत्र शिरीष नाईक हे नवापूरचे विद्यमान आमदार आहेत. सून रजनी नाईक यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे.
गांधी घराण्याचे अतिशय निष्ठावंत राहिलेल्या सुरुपसिंग नाईक यांच्यासाठी इंदिरा गांधी यांनी खांडबाऱ्यात सभा घेतली होती. आणीबाणीनंतर नेत्यांची पळवापळव सुरु असतांना लोकसभेवर निवडून आल्यानंतर रात्रीतून दिल्ली गाठून रात्रभर इंदिरा गांधी यांच्या गार्डनमध्ये सुरुपसिंग नाईकांनी मुक्काम ठोकला होता. सकाळी उठल्यानतंर इंदिरा गांधी यांना त्यांचे दर्शन झाले. आपणासही पळविण्यात येण्याच्या भीतीने आपण दिल्ली गाठल्याचे सांगणाऱ्या सुरुपसिंग नाईकांच्या निष्ठेवर इंदिरा गांधी भलत्याच खुष झाल्याची चर्चा आजही नंदुरबारमध्ये रंगते. त्यांच्या निधनाने नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील राजकीय, सामाजीक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
