धुळे,: तालुक्यातील मुकटी येथील देविदास नामदेव पवार यांच्या निर्घृण खूनप्रकरणी धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायमूर्ती आर. एन. हिवसे यांनी आज (दि.२) हा निकाल दिला.

पियु पोपट दावलसे (भिल), राजू पौलाद मोरे (भिल) व महेंद्र माधवराव देवरे यांना न्यायालयाने दोषी ठरविले. तिघांना  जन्मठेप तसेच प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास दोन महिन्यांची सक्तमजुरी भोगावी लागेल असेही न्यायालयाने निकाल पत्रात म्हटले असून मृताच्या पत्नी सरलाबाई देविदास पवार यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत योग्य ती नुकसानभरपाई देण्याची शिफारस केली आहे.

 काय होती घटना?

२७ एप्रिल २०१८ रोजी मुकटी येथील रहिवासी दगडू पुंडलीक मराठे व देविदास नामदेव पवार हे आपले कामकाज आटोपून परतत असताना हल्लेखोरांनी त्यांना अडवून दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र दोघांनीही पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या तिघांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण करून “तुम्हाला बघून घेतो” अशी धमकी दिली. त्याच रात्री दगडू मराठे व देविदास पवार हे शेतातील खाटेवर झोपले असताना  सुमारे ११ ते १२ वाजेच्या दरम्यान तिघेही तेथे पोहोचले. देविदास पवार झोपेत असतानाच त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण कुऱ्हाडीने वार करण्यात आले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी पुढे आलेल्या दगडू मराठे यांनाही मारहाण करून गंभीर जखमी केले होते. जखमी देविदास पवार यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

गुन्हा दाखल व तपास

या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाची जबाबदारी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राजाराम भालेराव यांच्याकडे सोपविण्यात आली होती. तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. तसेच घटनास्थळावरील पुरावे, वैद्यकीय अहवाल व इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीं संशयितांविरुद्ध  न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

न्यायालयातील सुनावणी

सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायमूर्ती आर. एन. हिवसे यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता निलेश भगवान कलाल यांनी प्रभावी युक्तिवाद केला. सरकार पक्षाने एकूण १० साक्षीदार व तीन न्यायालयीन साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयासमोर नोंदविल्या. यात तक्रारदार व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दगडू पुंडलीक मराठे, पंच साक्षीदार मकरंद माधवराव पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश गढरी, डॉ. नितीन जिजाबराव पवार, डॉ. राहुल रमेश पाटील, डॉ. श्वेता गोसावी, तपासी अधिकारी ज्ञानेश्वर भालेराव तसेच मृताची पत्नी सरलाबाई देविदास पवार यांच्या महत्त्वपूर्ण साक्षींचा समावेश होता.

सरकार पक्षाचा प्रभावी युक्तिवाद

सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता निलेश कलाल यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष, वैद्यकीय पुरावे आणि विविध उच्च न्यायालयांच्या निर्णयांचा आधार घेत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. मृत देविदास पवार यांच्या पश्चात त्यांची विधवा पत्नी व अल्पवयीन मुले निराधार झाल्याची बाबही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

नुकसानभरपाईची शिफारस

या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे, मयताच्या कुटुंबाची झालेली अपरिमित हानी लक्षात घेऊन न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३५७-अ(२) अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला मयताच्या वारसांना योग्य नुकसानभरपाई देण्याची शिफारस केली आहे.

सरकार पक्षाची बाजू

या खटल्यात जिल्हा सरकारी अभियोक्ता देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता निलेश भगवान कलाल यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. सादर करण्यात आलेल्या भक्कम पुराव्यांमुळे न्यायालयाने तिन्ही संशयितांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.