धुळे: भाजपमधील बंडखोरांना विरोधकांनी आमिष दाखवून तिकीट दिल्याचा आरोप भाजपचे नेते तथा माजी मंत्री जयकुमार रावल यांनी केला आहे. धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांकडून लोकशाहीविरोधी कृत्ये सुरू असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला.
मंत्री जयकुमार रावल यांनी आज प्रसारमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, धुळे शहरातील ६३ जागांसाठी भाजपकडे तब्बल ४५० इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती. पक्षाने नियमानुसार ६३ उमेदवारांना अधिकृत तिकीट दिले. मात्र, तिकीट न मिळालेल्या काही इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण झाली. याच नाराजीचा गैरफायदा घेत विरोधी पक्षांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना फूस लावून, आमिष दाखवून आपल्या गोटात ओढले आणि ऐनवेळी ‘एबी फॉर्म’ देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले, असा आरोप त्यांनी केला.
या प्रक्रियेत काही ठिकाणी दडपशाही होत आहे. भाजपच्या काही कार्यकर्त्यांना चक्क खोल्यांमध्ये बंद करून ठेवण्यात आल्याचे सांगत, अशा प्रकारे उमेदवारांना डांबून ठेवणे म्हणजे लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रकार असल्याची तीव्र टीका त्यांनी केली. प्रत्येक उमेदवाराला आपली भूमिका मोकळेपणाने मांडण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रागाच्या भरात किंवा चुकीच्या मार्गदर्शनामुळे अपक्ष किंवा अन्य पक्षांकडून फॉर्म भरलेल्या काही बंडखोरांनी माघार घेण्यास सुरुवात केली.
धुळे शहराच्या विकासावर भर देत रावल म्हणाले की, ‘स्मार्ट सिटी’ आणि ‘सुंदर सिटी’ म्हणून धुळ्याचा विकास करण्यासाठी जनता भाजपच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. विरोधकांनी कितीही आमिषे दाखवली किंवा खेळी केल्या तरी अखेरीस जनतेचा कौल विकासाच्या बाजूनेच लागेल, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आदर्श आचारसंहिता धुळे शहरात लागू असून, त्यानुसार कोणत्याही प्रकारचे आमिष, दबावतंत्र किंवा प्रलोभने देणे हा गंभीर उल्लंघनाचा प्रकार ठरतो. उमेदवारांची फूस लावणे, त्यांना डांबून ठेवणे किंवा आर्थिक-राजकीय आमिषे दाखवणे, असे प्रकार घडत असल्यास त्याची दखल घेऊन संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे. लोकशाही प्रक्रियेची पवित्रता जपण्यासाठी निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक राहणे आवश्यक असल्याचे मतही या निमित्ताने व्यक्त केले जात आहे.
धुळे शहराची राजकीय पार्श्वभूमी पाहता, येथील महापालिका निवडणूक नेहमीच चुरशीची ठरली आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर पक्षांमध्ये सत्तासंघर्षाची दीर्घ परंपरा असून, स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि नेतृत्व यावरच मतदारांचा कौल अवलंबून राहिला आहे. सध्याच्या निवडणुकीतही प्रत्येक पक्ष आपली ताकद दाखवण्याच्या प्रयत्नात असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारांचे लक्ष विकास, पारदर्शक प्रशासन आणि स्थिर नेतृत्वाकडे राहणार की राजकीय आरोपांच्या भोवऱ्यात निवडणूक अडकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
