धुळे : येथील महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना ७४ जागां साठी तब्बल ५५० इच्छुकांनी मुलाखत दिली. ही संख्या भाजपाची संघटनात्मक ताकद दर्शवित असली, तरी त्याचवेळी योग्य उमेदवार निवडण्याची कसोटीही असल्याचे अदोरेखित झाले आहे.
धुळे महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पक्षाची कोअर कमिटी स्थापन करण्यात आली आहे. भाजपने या निवडणुकीत ७४ पैकी किमान ६० जागा लढविण्याचा निर्धार केला असून, यासाठी तब्बल ५५० इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्याने पक्ष नेतृत्वापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
महानगरपालिकेतील प्रत्येक प्रभागात सरासरी २५ ते ३० इच्छुक उमेदवार असल्याने उमेदवारी देताना पक्षाला काटेकोर गाळणी लावावी लागणार आहे. विकासकामे, पक्षनिष्ठा, सामाजिक प्रतिनिधित्व, विजयाची शक्यता आणि महायुतीतील समन्वय अशा विविध निकषांवर उमेदवारांची निवड करावी लागणार असल्याचे पक्षातील जाणकारांचे मत आहे. मात्र, मोठ्या संख्येने इच्छुक असल्याने उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करायची, हा प्रश्न भाजप नेतृत्वासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या कोअर कमिटीत पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली शहराचे आमदार अनुपभय्या अग्रवाल, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे आणि माजी आमदार कुणाल पाटील यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. तसेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी आणि माजी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांना विशेष आमंत्रित सदस्य करण्यात आले आहे. ही कोअर कमिटी इच्छुक उमेदवारांची छाननी करून नावे शॉर्टलिस्ट करेल आणि ती प्रदेशाध्यक्षांकडे पाठवेल. त्याचबरोबर महायुतीतील घटक पक्षांशी जागावाटपाबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेणे, प्रचाराचे नियोजन करणे आणि निवडणूक काळात समन्वय राखणे, अशी महत्त्वाची जबाबदारी या समितीवर असेल.
दरम्यान, उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांची नाराजी निवडणुकीत नुकसानकारक ठरू नये, यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून संवाद, समजूत काढणे आणि संघटनात्मक शिस्तीवर भर दिला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ७४ जागांसाठी ५५० इच्छुक ही बाब भाजपची संघटनात्मक ताकद दर्शवित असली, तरी त्याचवेळी योग्य उमेदवार निवडण्याची कसोटीही असल्याचे चित्र सध्या धुळे राजकारणात पाहायला मिळत आहे.
खास बाब म्हणजे, भाजपसमोर केवळ उमेदवार निवडीचेच नव्हे तर सामाजिक व भौगोलिक समतोल राखण्याचेही आव्हान आहे. महिला, युवक, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती तसेच अल्पसंख्याक घटकांना योग्य प्रतिनिधित्व देतानाच, प्रत्येक प्रभागातील स्थानिक समीकरणे लक्षात घेणे आवश्यक ठरणार आहे. तसेच, मागील निवडणुकांतील अनुभव, जनसंपर्क, संघटनात्मक कामगिरी आणि निवडणूक खर्च उचलण्याची क्षमता हे मुद्देही निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे उमेदवारीची गाळणी जितकी कठोर असेल, तितकीच नाराजी कमी ठेवण्यासाठी समतोल निर्णय घ्यावा लागणार आहे. ही निवडणूक भाजपसाठी केवळ संख्याबळाची नव्हे, तर नेतृत्वाची, संघटन कौशल्याची आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याच्या क्षमतेची कसोटी ठरणार असल्याचे राजकीय निरीक्षकांकडून बोलले जात आहे.
