धुळे : नागपूर – सुरत महामार्गवरील अक्कलपाडा (ता.साक्री) शिवारात आज (दि. २६) दुपारी साडेचार ते पाच वाजेदरम्यान डिझेल वाहून नेणारा टँकर दुभाजकावर धडकून पलटी झाल्याने टँकरने पेट घेतला. यामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, अग्निशमन दल व पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे लागलेली आग तातडीने विझवण्यात आली. यामुळे  अत्यंत ज्वलनशील इंधनामुळे टँकच्या संभाव्य स्फ़ोटाचा धोका टळला असे म्हटलेजाते आहे. या घटनेनंतर वाहतूकही सुरळीत करण्यात आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित अथवा मोठी वित्तीय हानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जीजे – टीबी ६९९९ या क्रमांकाचा टँकर बडोदा (गुजरात) येथून नागपूरकडे जात होता. संबंधित टँकर हा मुरलीधर ट्रान्स लाईन कंपनीचा असून तो आयओसीएलचे डिझेल वाहून नेत होता.नागपूर – सुरत महामार्गवरील साक्री शिवारात आल्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर रस्ता दुभाजकावर धडकला आणि पलटी झाला.

पलटी झाल्यानंतर डिझेल गळती झाल्यामुळे आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संभाव्य धोका टाळण्यासाठी त्यांनी आधी महामार्गवरील वाहतूक थांबवून परिसर सुरक्षित केला आणि आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले. मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. चालकाची प्रकृती सुरक्षित असल्याचेही सांगण्यात आले. साक्री रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. दरम्यान, पर्यावरणीय धोका टाळण्यासाठी रस्त्यावर सांडलेल्या  डिझेलमुळे संभाव्य अपघात होऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेण्यासंदर्भात पोलिसांनी सूचित केले. तसेच, अपघातामुळे रस्त्याच्या दुभाजकाचे झालेले नुकसान दुरुस्त करण्याचे काम संबंधित विभागाकडून लवकरात लवकर हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आणखी एक मालमोटारीला आग…

मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बॅक्टरी घेऊन जाणाऱ्या एका मालमोटारीलाही अचानक आग लागली. मध्यप्रदेशमधून  धुळ्याकडे बॅटरीज भरून येताना ही घटना घडली. चालत्या मालमोटारीत बॅटरी पेटल्याने धूर निघू लागला आणि नरडाणा (ता. शिंदखेडा) शिवारात ही घटना चालकाच्या निदर्शनास आली. या घटनेची माहिती मिळताच नरडाणा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

या घटनेमुळे काही काळ मुंबई – आग्रा महामार्गवरची वाहतूक बंद ठेवण्यात आली, यानंतर मात्र पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. आज दिवसभरात सलग घडलेल्या या घटनेनंतर जड वाहनचालकांना वेगमर्यादा पाळण्याचे व लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आवश्यक विश्रांती घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. साक्री रस्ता हा धुळे शहरासाठी महत्त्वाचा दळणवळण मार्ग असल्याने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सीसीटीव्ही देखरेख, इशारा फलक आणि रस्ते सुरक्षा उपाय अधिक बळकट करण्याची गरज व्यक्त होत आहे.