धुळे : पावसाळा संपल्यानंतर धुळे पाटबंधारे विभागांतर्गत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असला, तरी गतवर्षाच्या तुलनेत यंदा जलसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे. धुळे पाट बांधारे विभागाच्या २९ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पाणीपातळी अहवालात धुळे वं नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांतील प्रकल्पांमध्ये एकूण ५१६ दलघमी (१८.२२ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून त्याची टक्केवारी ७९.७७ इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. गतवर्षी याच कालावधीत हा साठा सुमारे ९५ टक्क्यांवर होता.
धुळे जिल्ह्यातील प्रमुख मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असली, तरी काही प्रकल्पांमध्ये पाणीपातळी घटल्याने आगामी उन्हाळ्यात पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी पाणी उपलब्धतेचे नियोजन प्रशासनासमोर आव्हान ठरणार आहे. यामुळे संभाव्य टंचाई दृष्टीक्षेपात ठेऊन आतापासूनच प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.
८२.९४ टक्के पाणीसाठा
धुळे जिल्ह्यातील पांझरा प्रकल्पात ३५.६३ दलघमी म्हणजेच ९३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच दिवशी या प्रकल्पात ९३.१२ टक्के साठा होता. कनोली प्रकल्पात १०० टक्के म्हणजे ०.३० दलघमी, तर बुराई प्रकल्पात १३.६४ दलघमी म्हणजे ९५.९९ टक्के पाणीसाठा आहे. करवंद प्रकल्पात १५.७७ दलघमी म्हणजे ८६.३६ टक्के, तर अनेर प्रकल्पात ४८.३५ दलघमी म्हणजे ९८.२३ टक्के पाणी उपलब्ध आहे. सोनवद प्रकल्पातील साठा ५९.६८ टक्के असून अक्कलपाडा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. अक्कलपाडा प्रकल्पात ३९.२९ दलघमी म्हणजे १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. अमरावती प्रकल्पातील पाणीसाठा मात्र तुलनेने कमी असून येथे ११.४४ दलघमी म्हणजे ५८ टक्के साठा उपलब्ध आहे. सुलवाडे प्रकल्पात ६५.०६ दलघमी म्हणजे १०० टक्के पाणीसाठा आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व मध्यम प्रकल्पांचा एकत्रित विचार करता ३२७.८४ दलघमी उपयुक्त साठ्यापैकी २७१.१२ दलघमी म्हणजे ८२.९४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच कालावधीत हा साठा सुमारे ८६ टक्के होता.
नंदुरबारला पाणीसाठा ८५.७६ टक्के
नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांचा एकत्रित पाणीसाठा ८५.७६ टक्के आहे. धुळे व नंदुरबार विभागातील सर्व प्रकल्पांचा एकत्रित उपयुक्त साठा ६४६.८३ दलघमी असून त्यापैकी ५१६ दलघमी पाणी उपलब्ध आहे. दरम्यान, यंदा पावसाळ्यात काही भागात अपेक्षित पर्जन्यमान न झाल्याने जलसाठ्यात गतवर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. सध्या उपलब्ध साठा समाधानकारक असला तरी उन्हाळ्यात वाढणारी पिण्याच्या पाण्याची मागणी, शेतीसाठी आवश्यक सिंचन आणि ग्रामीण भागातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाला आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे. पाटबंधारे विभागाकडून पाण्याचे आवर्तन, कालव्यांमधून होणारा विसर्ग आणि पिण्याच्या पाण्यासाठी राखीव साठा याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे. काही प्रकल्पांतील घट लक्षात घेता भविष्यातील संभाव्य दुष्काळसदृश परिस्थिती टाळण्यासाठी जलस्रोतांचा वापर जपून करणे गरजेचे असल्याचे चित्र आहे.
यंदा पावसाळ्यात जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत २,०९७ मिमी पाऊस नोंदविण्यात आला असून, गतवर्षी याच कालावधीत ३,३०१ मिमी पाऊस झाला होता. म्हणजेच यंदा पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असतानाही बहुतांश मोठ्या व मध्यम धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता कमी असली, तरी रब्बी हंगामातील सिंचन, औद्योगिक वापर आणि उन्हाळ्यातील गरजा लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध व काटकसरीने वापर करणे गरजेचे असल्याचे पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
