धुळे, महसुली जमिनीच्या पट्ट्यांवर मिळणाऱ्या सर्व शासकीय योजना लवकरच वन जमिनीच्या पट्ट्यांवरही लागू करू, गेल्या दीड वर्षात जिल्ह्यात तब्बल ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली. भविष्यात धुळे, नंदुरबार हे जिल्हे राज्याची प्रमुख औद्योगिक केंद्रे बनतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शिरपूर येथे २५ एप्रिल रोजी दुपारी स्व. तपनभाई पटेल मेमोरिअल हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. त्यानंतर आर. सी. पटेल औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित विविध शैक्षणिक संस्था, औद्योगिक उपक्रमांचे उद्घाटन व‌ भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, आमदार शिरीष नाईक, आमदार राघवेंद्र पाटील, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राजेश पाडवी, आमदार मंजुळा गावित, आमदार आमश्या पाडवी, धुळ्याच्या महापौर माया परदेशी, माजी खासदार डॉ.सुभाष भामरे, डॉ. हीना गावित, शिरपूरचे नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, भुपेशभाई पटेल ,जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते आदी उपस्थित होते.

४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक…

मुख्यमंत्री म्हणाले, धुळे जिल्ह्याचा आकांक्षीत जिल्ह्यांमधील समावेशानंतरच्या गेल्या दीड वर्षांत जिल्ह्यात तब्बल ४० हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक आली आहे. यात प्रामुख्याने रसायन व अन्नप्रक्रिया क्षेत्रात एक हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित झाली असून, केवळ सामंजस्य करार न करता हे उद्योग प्रत्यक्ष उभारले जातील. याशिवाय, दोंडाईचा येथील २५० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प हरित ऊर्जेच्या दृष्टीने एक मोठा टप्पा ठरणार आहे. महामार्गांचे जाळे, सिंचन व्यवस्था, मुंबई-दिल्ली औद्योगिक पट्टा आणि इंदूर-मनमाड रेल्वेमुळे या भागात एक मोठी व सक्षम औद्योगिक परिसंस्था तयार झाली आहे.

  • वन जमिनीवरही आता अन्य योजनांचा लाभ …

महसुली जमिनीच्या पट्ट्यांवर मिळणाऱ्या सर्व शासकीय योजना लवकरच वन जमिनीच्या पट्ट्यांवरही लागू केल्या जातील, यामुळे आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळेल, शिरपूर आणि परिसराच्या सर्वांगीण विकासात आपण तालुक्याच्या पाठीशी एका ‘भावासारखे’ पूर्ण ताकदीने उभे राहू, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

  • मुख्यमंत्र्यांकडे मंत्री रावल यांनी काय मागितलं

जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी नरडाणा-शिरपूर परिसरातील दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिकेला चालना देण्यासह शिरपूर व धुळे येथील विमानतळांचा विकास, मालवाहतूक केंद्र व सिंचनाच्या सुलवाडे-जामफळ, प्रकाशा-बुराई, अक्कलपाडा यांसारख्या अपूर्ण प्रकल्पांना पूर्ण क्षमतेने चालना देण्यासाठी विशेष निधीची आवश्यकता आहे. जिल्ह्याच्या प्रशासनातील रिक्त पदेही तातडीने भरावीत, अशी मागणी रावल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.