धुळे : रेल्वे रुळाजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक अनोळखी तरुण… खिशातील मोबाईलवर वारंवार येणारे फोन… आणि त्या एका कॉलने अखेर उलगडलेली त्याची ओळख! नरडाणा-शिंदखेडा रेल्वेमार्गावर घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अहमदाबादहून आपल्या मूळ गावी मालदा (पश्चिम बंगाल) येथे जाण्यासाठी रेल्वेने निघालेल्या २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने नेमके काय घडले, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार,संबंधित तरुण हा दोन दिवसांपूर्वी गुजरातमधील अहमदाबाद येथून रेल्वेने पश्चिम बंगालमधील मालदा येथे जाण्यासाठी निघाला होता. मात्र, तो आपल्या गावी पोहोचण्यापूर्वीच त्याच्यावर काळाने झडप घातली. तीन नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास होळ (ता. शिंदखेडा) गावाच्या शिवारात, नरडाणाकडून शिंदखेड्याकडे जाणाऱ्या रेल्वे रुळाच्या उजव्या बाजूस हा तरुण गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला स्थानिक ग्रामस्थांना दिसून आला. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीची ओळख पटत नसल्याने काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
मोबाईलवर वारंवार फोन…
याचवेळी त्या तरुणाच्या खिशातील मोबाईलवर वारंवार फोन येऊ लागला. पोलिसांनी तो कॉल स्वीकारला असता समोरून बोलणाऱ्या सैय्यान शेख यांनी जखमी तरुणाची ओळख आपला चुलत भाऊ रमजान शेख रोजान शेख (२८) अशी सांगितली. तो अहमदाबादहून रेल्वेने मालदाकडे रवाना झाल्याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली. या एका फोनमुळे अनोळखी मृतदेहाची ओळख पटली आणि नातेवाईकांपर्यंत माहिती पोहोचविणे शक्य झाले.
दरम्यान, पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रमजानला तातडीने नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज राजपूत यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. रमजान रेल्वेतून पडला की त्याच्यासोबत अन्य काही घडले, हा अपघात होता की इतर कोणते कारण होते, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे या मृत्यूभोवती गूढ निर्माण झाले असून पोलिसांनी विविध शक्यता पडताळण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे परिसरातील परिस्थिती, संबंधित रेल्वेचा प्रवास, तसेच इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर नरडाणा पोलिसांनी रेल्वे मार्ग परिसराची पाहणी करून प्राथमिक माहिती संकलित केली आहे. रमजान शेख कोणत्या रेल्वेगाडीतून प्रवास करत होता, तो नेमका कोणत्या ठिकाणी उतरला किंवा रेल्वेतून खाली कसा पडला, याचा शोध घेतला जात आहे. रेल्वे प्रशासनाकडूनही संबंधित मार्गावरील हालचालींची माहिती घेण्यात येत आहे. प्रवासादरम्यान सहप्रवाशांना काही संशयास्पद बाब जाणवली होती का, याचाही तपास केला जाणार आहे. परराज्यातील तरुणाचा अशा परिस्थितीत मृत्यू झाल्याने घटनास्थळी मोठी हळहळ व्यक्त झाली. तपासातून या घटनेमागची सत्यता काय आहे हे उलगडण्याची प्रतीक्षा आहे.
