धुळे : नाशिक येथे होणाऱ्या महाकुंभ २०२७ च्या पार्श्वभूमीवर धुळे-चाळीसगाव-मनमाड-नाशिक या मार्गावर प्रस्तावित अतिरिक्त मेमू रेल्वेसेवेची महाकुंभ सुरू होण्यापूर्वीच प्रत्यक्ष चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयेश संगिता दिनेश बाफना यांनी केली आहे. महाकुंभ सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाढल्यानंतर अडचणी शोधण्यापेक्षा त्यापूर्वीच चाचणी घेऊन आवश्यक सुधारणा करणे अधिक योग्य ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
धुळे-चाळीसगाव-मनमाड-नाशिक या मार्गावर अतिरिक्त मेमू रेल्वेसेवा सुरू करावी यासाठी बाफना सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. यासाठी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने सादर करून या मार्गावरील प्रवाशांची गरज आणि अतिरिक्त रेल्वेसेवेची आवश्यकता याकडे लक्ष वेधले आहे.
या पाठपुराव्याला आता महत्त्व प्राप्त झाले असून रेल्वे प्रशासनाने त्यांच्या निवेदनाच्या उत्तरात २९ सप्टेंबर २०२६ रोजी अतिरिक्त रेल्वेसेवेचा प्रस्ताव नियोजन व मंजुरी प्रक्रियेत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे धुळे-चाळीसगाव-मनमाड- नाशिक मार्गावरील अतिरिक्त रेल्वेसेवेबाबत प्रशासनाच्या पातळीवर हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, प्रस्ताव नियोजनात असताना त्याची प्रत्यक्ष चाचणी कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे. यामुळेच महाकुंभपूर्वीच मेमू रेल्वेची चाचणी घेण्याची मागणी होते आहे.
आताच परिचालनातील अडचणी शोधण्याची गरज
महाकुंभाच्या काळात नाशिक येथे देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत. या काळात अचानक सेवा सुरू करून परिचालनातील अडचणी शोधण्यापेक्षा आधीच चाचणी घेऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. चाचणीमधून आढळणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला पुरेसा वेळ मिळेल, असे त्यांनी सांगितले. प्रस्तावित चाचणीमधून प्रत्यक्ष प्रवासी मागणी, रेल्वेच्या वेळापत्रकाची व्यवहार्यता, रेल्वे डब्यांची उपलब्धता, कर्मचारी व्यवस्था, गाडीची परतीची व्यवस्था, गाडी उभी करण्याची सुविधा, नाशिक रोड स्थानकावरील परिचालन व्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्थेचा अभ्यास करता येणार आहे.
धुळे ते नाशिकदरम्यान सुरू असलेल्या रस्ते विकास कामांमुळे सध्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडी आणि प्रवासासाठी लागणारा वाढीव वेळ यामुळे पर्यायी वाहतूक व्यवस्थेची गरज निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत धुळे- चाळीसगाव- मनमाड- नाशिक मार्गावर अतिरिक्त मेमू रेल्वेसेवा उपलब्ध झाल्यास प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि सोयीचा पर्याय मिळू शकतो. चाचणीदरम्यान काही अडचणी आढळल्या तर त्या महाकुंभ सुरू होण्यापूर्वी दूर करता येतील. ऐन महाकुंभाच्या काळात अडचणी निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आधीच नियोजन करणे प्रवाशांच्या हिताचे आहे असा दावा केलाजातो आहे.
बाफना यांनी केलेल्या मागण्या अशा –
रेल्वे प्रशासनाकडे धुळे-चाळीसगाव-मनमाड-नाशिक मार्गावर महाकुंभ २०२७ पूर्वी मेमू रेल्वेची चाचणी सेवा सुरू करावी, चाचणी पुरेशा कालावधीसाठी चालवून प्रत्यक्ष प्रवासी व परिचालन माहिती संकलित करावी, चाचणीच्या आधारे वेळापत्रक, रेल्वे डबे, कर्मचारी व्यवस्था, गाडीची परतीची व्यवस्था आणि नाशिक रोड स्थानकावरील व्यवस्थेचा अभ्यास करावा, तसेच आढळणाऱ्या अडचणी महाकुंभापूर्वी दूर कराव्यात, अशा मागण्या केल्या आहेत. ही मेमू सेवा प्रत्यक्ष सुरू झाल्यास धुळे आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा फायदा होऊ शकतो. तसेच भविष्यात धुळे परिसराला पुणे, मुंबई यांसारख्या प्रमुख शहरांशी अधिक सक्षम रेल्वे जोडणी देण्याच्या दृष्टीनेही या सेवेमुळे महत्त्वाची माहिती उपलब्ध होईल असा विश्वास यानिमित्त व्यक्त करण्यात आला आहे .या पार्श्वभूमीवर महाकुंभ २०२७ च्या पार्श्वभूमीवर धुळे व परिसरातील प्रवाशांसाठी सुरळीत, सुरक्षित आणि नियोजित रेल्वे प्रवासाचा पर्याय उपलब्ध व्हावा, तसेच ऐनवेळी परिचालनातील अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी रेल्वे प्रशासनाने महाकुंभपूर्वीच मेमू रेल्वेच्या चाचणीबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
