धुळे : धुळे-चाळीसगाव-मनमाड-नाशिक मेमू रेल्वेसेवेची महाकुंभपूर्वी चाचणी धाव घ्यावी, या मागणीला आता डिजिटल जनआंदोलनाचे स्वरूप मिळाले आहे. या मागणीसाठी क्यूआर संकेतांकाच्या माध्यमातून थेट रेल्वे प्रशासनाला ई-मेल पाठविण्याचे अभियान सुरू करण्यात आले असून, अवघ्या ३० सेकंदांत नागरिक आपला पाठिंबा नोंदवू शकत आहेत. अधिकाधिक ई-मेल रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचल्यास ही मागणी अधिक प्रभावीपणे मांडता येईल, असा विश्वास अभियानाच्या समन्वयकांनी व्यक्त केला आहे.
क्यूआर संकेतांक…
या अभियानासाठी विशेष क्यूआर संकेतांक तयार करण्यात आला आहे. नागरिकांनी हा संकेतांक भ्रमणध्वनीवरून स्कॅन केल्यानंतर संबंधित ई-मेल आपोआप उघडतो. त्यामध्ये केवळ स्वतःचे नाव नमूद करून ‘पाठवा’ या पर्यायावर स्पर्श केल्यानंतर ई-मेल थेट रेल्वे प्रशासनाकडे पाठविला जातो. त्यामुळे कोणतेही स्वतंत्र पत्र तयार करण्याची किंवा ई-मेल पत्ता शोधण्याची गरज राहत नाही. कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांचा सहभाग मिळावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. अशी माहीती जयेश बाफना यांनी दिली.
महाकुंभ २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिककडे भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे धुळे-चाळीसगाव-मनमाड-नाशिक मार्गावर मेमू रेल्वेची चाचणी धाव महाकुंभापूर्वीच घेण्यात यावी, अशी या ई-मेलमधून मागणी करण्यात येत आहे. चाचणी धाव झाल्यास वेळापत्रकाची अचूकता, प्रवाशांचा प्रतिसाद, स्थानकांवरील सुविधा आणि परिचालनातील अडचणी यांचा आधीच अभ्यास करून आवश्यक सुधारणा करता येतील, असा दावा अभियानकर्त्यांनी केला आहे. या मोहिमेत प्रत्येक नागरिकाने स्वतः ई-मेल पाठविण्याबरोबरच तोच क्यूआर संकेतांक मित्र, नातेवाईक आणि विविध समाजमाध्यम गटांमध्ये प्रसारित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एका व्यक्तीने पाठविलेला ई-मेल महत्त्वाचा असला तरी हजारो नागरिकांचा एकत्रित सहभाग हीच या अभियानाची खरी ताकद असल्याचे अभियानकर्त्यांचे म्हणणे आहे.
या उपक्रमाचा उद्देश केवळ महाकुंभापुरता मर्यादित नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. धुळे, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिकदरम्यान नियमित व सक्षम रेल्वे सेवा सुरू झाल्यास उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना दीर्घकालीन फायदा होणार आहे. भविष्यात मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांशी अधिक सक्षम रेल्वे संपर्क निर्माण करण्यासाठीही हा लोकसहभाग महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे ‘स्कॅन करा, ई-मेल पाठवा आणि पुढे पाठवा’ या संदेशाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला असून, या डिजिटल मोहिमेकडे आता रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे.
अभियानकर्त्यांनी नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाऐवजी लोकशाही मार्गाने आपली मागणी नोंदविण्याचे आवाहन केले आहे. ई-मेलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनमत व्यक्त झाल्यास धुळे-चाळीसगाव-मनमाड-नाशिक मार्गावरील मेमू सेवेच्या चाचणी धावीसंदर्भात रेल्वे प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक हिताची ही मागणी अधिक प्रभावी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतः ई-मेल पाठवून किमान दहा जणांपर्यंत क्यूआर संकेतांक पोहोचवावा, असे आवाहनही अभियानाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
