धुळे: अवघ्या दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने निरीक्षकपदी नियुक्ती केली, यानंतर ठिकठिकाणी सत्कारात स्वीकारलेले पुष्पगुच्छ सुकत नाहीत, तोच माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख यांचे सख्खे भाऊ माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख हे भाजपात डेरेदाखल झाले. या प्रवेश सोहळ्यामुळे पालकमंत्री जयकुमार रावल यांची दोंडाईचाची राजकीय गढी अधिक सुरक्षित झाली आहे.
डॉ. देशमुख यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील दोंडाईचा-शिंदखेडा येथील राजकीय समीकरणे पुन्हा ढवळून निघाली आहेत. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच विविध राजकीय पक्षांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.पैकी अनेक चर्चा प्रत्यक्ष धक्कादायक कृतीत परावर्तित होऊ लागल्याचे उदाहरण डॉ.देशमुख यांनी भाजपात केलेल्या प्रवेशातून अधोरेखित झाले आहे. यामुळे मात्र नेत्यांच्या मागेपुढे फिरणारे सामान्य कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. माजी नगराध्यक्ष आणि आजवर रावल यांच्याशी राजकीय वैर असलेले माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचे बंधू माजी नगराध्यक्ष रवींद्र देशमुख यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी आज भाजपात प्रवेश केला.
हा प्रवेश धक्कादायक यासाठी की, काल – परवाच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी डॉ. रवींद्र देशमुख यांची पक्ष निरीक्षक म्हणून नेमणूक केली. खास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन डॉ. देशमुख यांच्यावर दोंडाईचा शहराची जबाबदारी सोपविण्यात आली होती. असे असताना अवघ्या दोन दिवसातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निरीक्षक डॉ. देशमुख यांनी भाजपची वाट धरली आणि ते भाजपावासी झाले. यामुळे अजित पवार गटातील स्थानिक कार्यकर्त्यांना जोरदार धक्का बसला आहे. दुसरीकडे डॉ.देशमुख यांच्या प्रवेशामुळे मंत्री रावल यांच्यासमोर तेवढ्या दमाचा विरोधकच शिल्लक राहिला नाही यामुळे रावलांची गढी असलेले दोंडाईचा शहर रावल यांच्यासाठी राजकीय दृष्ट्या अधिक सुरक्षित झाले आहे. यामुळे मंत्री रावल यांचा दोंडाईचा येथील सत्तेचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे मानले जाते आहे.
भाजप, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यस्तरावर युती होईल का, याबाबत अद्याप स्पष्ट चित्र नाही. मात्र दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी अजित पवार गटातील डॉ. हेमंत देशमुख यांच्या गटाशी समझोता केल्याची चर्चा यानिमित्त खरी ठरली आहे. धुळे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून भाजपची मजबूत पकड असून जयकुमार रावल हे जिल्ह्याचे प्रमुख नेते मानले जातात. मात्र दोंडाईचा शहरात डॉ. हेमंत देशमुख यांचा प्रभाव मोठा असल्याचे मानले जाते. याच पार्श्वभूमीवर रावल यांनी डॉ. देशमुख यांच्या गटाशी युतीचा मार्ग स्वीकारण्याचा विचार केला असावा असे मानले जाते आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही डॉ. हेमंत देशमुख यांनी रावल यांना पाठिंबा दिला होता, परंतु त्यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती आणि त्याचा फटका भाजपला बसल्याचे मानले जाते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत त्याच परिस्थितीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता टाळण्यासाठी भाजपाला काहीसे लक्ष ठेवावे लागणार आहे. दोंडाईचा शहरात अजित पवार गटाचे डॉ. रविंद्र देशमुख, नाजीम शेख, रवींद्र जाधव आणि महेंद्र पाटील हे चारही संभाव्य उमेदवार मानलेजात होते. पैकी रवींद्र जाधव आणि डॉ.रवींद्र देशमुख या दोघांनीही भाजपात प्रवेश करून या चर्चेला विराम दिला आहे. दोंडाईचा-शिंदखेडा तालुक्यांतील भाजपची स्थिती गेल्या काही वर्षांपासून बळकट असली तरी अलीकडील घटनांनी गटबाजी आणि असंतोष वाढल्याचे अनेकदा अधोरेखित झाले. शिंदखेडा आणि शिरपूरमध्ये भाजप आणि शिंदे गटाची युती झालेली नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आजही गोंधळ आहे. जिल्ह्यात महायुती एकत्र न लढल्यास त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही व वस्तुस्थिती आहे. त्यामुळे दोंडाईचा नगरपालिका निवडणुकी निमित्त रावल-देशमुख समझोता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
विकसाला पाठिंबा – माजी नगराध्यक्ष डॉ.रविंद्र देशमुख
दोंडाईचा शहरासह शिंदखेडा मतदारसंघात मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड सुरू आहे. यामुळे विकासाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यापुढे दोंडाईचा शहर स्मार्ट सिटी झाल्याशिवाय राहणार नाही, ४० वर्षाची कटुता मिटावी असा अनेकांचा प्रयत्न होता असे स्पष्ट करून डॉ.हेमंत देशमुख यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत मंत्री जयकुमार रावल यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी नमुद केले.
