जळगाव : धुळ्याहून पारोळ्याकडे जात असलेल्या केमिकल टँकरने सबगव्हाण टोलनाक्यावर पुढे उभ्या असलेल्या कंटेनरला शनिवारी सायंकाळी उशिरा साडेसातच्या सुमारास मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर टायर फुटल्याने टँकरने पेट घेतला आणि काही क्षणांतच आगीच्या ज्वाळांनी वाहनाला वेढले. अपघातात टँकरमधील चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच टोलनाका परिसरात एकच धावपळ उडाली.
स्थानिक नागरिक, टोलनाका कर्मचारी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. आग वाढत असल्याने पारोळा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून शर्थीचे प्रयत्न करत आग पूर्णपणे आटोक्यात आणली. त्यामुळे टँकरमधील रसायनामुळे होऊ शकणारी संभाव्य मोठी दुर्घटना टळली. धडकेमुळे टँकरच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाल्याने चालकाला बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला. अपघातग्रस्त टँकरमध्ये टोल्युइन डायआइसोसायनेट हे रसायन भरलेले होते.
टोल्युइन डायआइसोसायनेट हे रसायन अत्यंत क्रियाशील औद्योगिक रसायन असून त्याचा वापर प्रामुख्याने लवचिक पॉलीयुरेथेन फोम, कोटिंग्ज, ॲडेसिव्ह्ज आणि इलास्टोमर्सच्या निर्मितीसाठी केला जातो. या रसायनाची वाहतूक करताना विशेष दक्षता घ्यावी लागते. सुदैवाने अपघातात टँकरमधील रसायनाची गळती झालेली नसून, ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कोणताही तातडीचा धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
सुरक्षेच्या कारणास्तव अपघातानंतर धुळे–पारोळा मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक तातडीने बंद करण्यात आली. त्यामुळे दोन्ही दिशांना अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवून वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी हाती घेतली. अपघातग्रस्त वाहने हटविणे, रस्ता सुरक्षित करणे आणि परिस्थिती सामान्य करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. काही काळ वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, महसूल प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्याचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.
अपघाताचे नेमके कारण, टँकरचा वेग, चालकाचे नियंत्रण कशामुळे सुटले आणि कंटेनर रस्त्यावर कोणत्या परिस्थितीत उभा होता, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, अपघातानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. अग्निशमन दलाने तत्काळ आग आटोक्यात आणली असून टँकरमधील रसायन सुरक्षित आहे. अपघातग्रस्त वाहने हटवून रस्ता स्वच्छ केल्यानंतर वाहतूक लवकरच पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
