धुळे – शहर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने खिडक्यांच्या जाळ्या काढून घरफोडी करणाऱ्या पाच जणांच्या खिडकी गँगला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दागिन्यांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांविरुध्द विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार ते पाच डिसेंबर २०२४ दरम्यान पहाटे शहरातील साक्रीरोड लगत असलेल्या महिंदळे शिवारातील राजेंद्र नगरमध्ये रघुनाथ सोनार यांच्या घरातून चोरांनी मुलाच्या लग्नासाठी जमविलेले सोने व रोख रक्कम असा १२ लाख ७८ हजार ८०५ रुपयांचा ऐवज चोरला होता. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

या गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्याकडे सोपविण्यात आला होता. चोरी झालेल्या दिवशी संबंधित भागातून पहाटे एक मोटार संशयितरित्या फिरतांना दिसली होती. ही मोटार घटनेच्या रात्री लळींग टोल नाका येथून पुढे गेल्याची माहिती मिळाल्यावर मोटारीचा नोंदणी क्रमांक मिळविण्यात आला. फास्टॅगवरील जोडणी असलेला मोबाईल क्रमांक प्राप्त करण्यात आला. जवळपास ६०० मोबाईल क्रमांक, १०० सीसीटीव्हींचे चित्रण आणि सुमारे २० टोल नाक्यांचे विश्लेषण करण्यात आल्यानंतर अखेर २४ एप्रिल रोजी संशयितांपर्यंत पोलीस पोहचले.

शेख अशफाक (रा. मोहम्मदिया कॉलनी, आझादनगर,बीड), आगामिर खान पठाण (रा. मोहम्मदिया कॉलनी, तेलगाव नाका, बीड), फिरोज शेख ( घोडेगाव, नेवासा, आहिल्यानगर), एहफाज शेख (३६, पिंपळगाव, गेवराई, बीड) आणि शेख कलीम (दहिफळ, बीड) या संशयितांना अटक करुन त्यांच्या ताब्यातून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयितांनी शहरातील देवपूर भागातील लक्ष्मी नगर येथील एका घरात नोव्हेंबर २०२४ मध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली. या घरफोडीतील दागिनेही काढून दिले.

शेख अशफाकवर विविध पोलीस ठाण्यात २४ तर आगामिर खानविरुद्ध २०, शेख कलीमविरुद्ध नऊ गुन्हे दाखल आहेत. फिरोज शेखवर यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे. प्रामुख्याने मराठवाड्यात या संशयितांनी अनेक ठिकाणी गुन्हे केल्याच्या नोंदी आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, मच्छिंद्र पाटील, संदीप पाटील, योगेश चव्हाण, हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ, अमोल जाधव आदींनी ही कामगिरी केली.