धुळे : शहरातील विविध भागात असलेल्या वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना संबंधित शाळेतच गाठून आज शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीसांनी चालकांची तपासणी केली. या अचानक सुरु झालेल्या तपासणीमुळे अवघ्या काही वेळातच संपूर्ण शहरात खळबळ उडाली. यामुळे विद्यार्थ्यांचे पालक मात्र सुखावले आहेत.

राज्यभरात शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या वाहनांमध्ये निष्काळजीपणे किंवा मद्यप्राशन करून वाहन चालविल्याने अनेक गंभीर अपघात घडले आहेत. काही ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत बसचालकांनी नियंत्रण गमावल्याने बस उलटण्याच्या घटना नोंदल्या गेल्या, तर अनेक विद्यार्थ्यांना जीवघेण्या दुखापतींनाही सामोरे जावे लागले. अशा घटनांनी पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर धुळे वाहतूक पोलिसांनी आज विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत विशेष कारवाई राबवून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.

पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार शहरातील चार महत्त्वाच्या शाळांमध्ये अचानक आणि व्यापक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. शाळा सुटण्याच्या दुपारच्या वेळेत पोद्दार इंटरनॅशनल स्कूल (नगाव), नेताजी डे स्कूल (फागणे), चावरा इंटरनॅशनल स्कूल (वाढीभोकर रोड) आणि एस.व्ही.के.एम. स्कूल (मोहाडी) या शाळांमध्ये वाहतूक पोलिसांची पथके दाखल झाली. विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्यासाठी शाळेच्या परिसरात उभी असलेली सर्व शालेय बस तपासणीसाठी निवडण्यात आली आणि चालकांची ब्रेथ अॅनालायझर (अल्कोमीटर)च्या सहाय्याने अल्कोहोल चाचणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान एकूण ४२ बसचालकांची चाचणी घेण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली.

विद्यार्थ्यांच्या जीवनाशी निगडित जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी प्रत्येक चालकाला वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. मद्यप्राशन करून वाहन चालवणे, वेगमर्यादा ओलांडणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित चढ-उताराकडे दुर्लक्ष करणे यांसारख्या नियमभंगांवर कडक कारवाई होणार असल्याची ताकीद पोलिसांनी दिली. यावेळी शालेय बसची फिटनेस तपासणी, विमा, परवान्यांची वैधता, प्रदूषण प्रमाणपत्र, बसमधील सुरक्षा सुविधा, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले प्रोटोकॉलचा नियमित आढावा घेणे हे शाळा प्रशासनाचे कर्तव्य असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

नियमांचे कुठलेही उल्लंघन आढळल्यास शाळा प्रशासनालाही जबाबदार धरण्यात येणार आहे. ही मोहीम एकदाच केली जाणार नाही तर येत्या काही दिवसांत शालेय रिक्षाचालकांचीही अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असून विद्यार्थ्यांच्या वाहतुकीत असलेल्या सर्व वाहनांवर कडक नजर ठेवली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे जीवित सर्वात महत्त्वाचे असल्याने मद्यपी किंवा निष्काळजी चालकांविरोधात कठोर कारवाई करण्याची पोलिसांची भूमिका कायम राहील, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले.

या तपासणीदरम्यान अनेक पालक शाळेबाहेर उपस्थित होते. अचानक पोलिसांची भन्नाट कारवाई सुरू झाल्याचे चित्र पाहताच त्यांनी आपली उत्सुकता व्यक्त केली. चालकांची एक-एक करून मशीनद्वारे घेतली जाणारी तपासणी, बसमध्ये केलेली पाहणी आणि पोलिसांकडून चालकांना दिल्या जाणाऱ्या सूचना यामुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. “मुलं सुरक्षित आहेत हे प्रत्यक्ष पाहायला मिळालं, त्यामुळे ही मोहीम सातत्याने चालू राहिली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी दिली. यामुळे प्रशासनाने घेतलेल्या या पुढाकाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

धुळे शहरात शाळांची संख्या वाढत असताना विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यात काही वाहनचालकांकडून नियमभंग होत असल्याच्या तक्रारी अधूनमधून पोलिसांकडे येत असतात. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने अशा तपासणी मोहिमांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काळात शाळा प्रशासन आणि पालकांनीही एकत्र येऊन सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले. विद्यार्थ्यांची सुरक्षा ही सामूहिक जबाबदारी असल्याने अशा मोहिमांना अधिक बळकटी देण्याची आवश्यकता असल्याचेही पोलिसांनी नमूद केले.

आजची कारवाई विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेले महत्त्वपूर्ण पाऊल असून भविष्यात अशा मोहिमा नियमितपणे राबविल्या जातील, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.