धुळे : कर्ज प्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत न्यायालयात सकारात्मक अहवाल पाठविण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस शिपायास रंगेहात पकडले.या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक साईनाथ भानुदास तळेकर आणि पोलीस शिपाई अविनाश अरविंद सादरे यांच्यावर ही कारवाई झाली. दोघांना ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. न्यायालयात सकारात्मक अहवाल सादर करण्यासाठी सुरुवातीला ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असून तडजोडीनंतर ४० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले होते.
यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या सासऱ्यांच्या नावावर धुळे तालुक्यातील वलवाडी (ता. धुळे) येथे घर आहे. या घराच्या कागदपत्रांचा गैरवापर करून धुळे येथील एका दाम्पत्याने सन २०१५ मध्ये एका वित्त कंपनीकडून परस्पर ३६ लाख १० हजार रुपयांचे गृहकर्ज घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तक्रारदाराच्या सासऱ्यांनी धुळे न्यायालयात फौजदारी किरकोळ अर्ज दाखल केला होता.
या अर्जावर संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत न्यायालयात सकारात्मक अहवाल पाठविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तीन ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. विभागाने पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याची खात्री झाली. त्यानंतर तडजोडीनंतर ४० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार चार ऑगस्ट रोजी सापळा रचण्यात आला.
पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस शिपाई अविनाश सादरे यांनी तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. यानंतर पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे यांनी काम पाहिले, तर तपास पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल करीत आहेत. या कारवाईत पोलीस हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा तसेच पोलीस कॉन्स्टेबल रामदास बारेला, प्रविण पाटील आणि मकरंद पाटील यांनी सहभाग घेतला. दरम्यान, कोणताही लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास किंवा भ्रष्टाचारासंदर्भात माहिती असल्यास त्वरित विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.
