धुळे : कला केंद्रात झालेल्या वादातून गर्भवती महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अमानुष हत्याकांडात संबंधित महिलेचा तसेच तिच्या पोटातील अर्भकाचाही मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चाळीसगाव-धुळे महामार्गालगत गरताडबारी येथील निर्जन परिसरात आढळलेल्या जळीत महिलेची ओळख पटली असून पिंकी हनुमंत काटकर (३१, रा. रोहा, जि. रायगड) असे मृत महिलेचे नाव आहे.
मोहाडी नगर पोलिसांनी या जळीत हत्याकांडाचा अवघ्या तीन दिवसांत उलगडा करत मुख्य सूत्रधारासह चार जणांना अटक केली आहे. तर आणखी एक महिला आणि एका पुरुष संशयिताचा शोध सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये सफराज उर्फ शफीक अलीम मोमीन (३८, रा. गांधीनगर, कळंब, जि. धाराशिव), आरिफ उर्फ खुज्या आसिफ शेख (३१, रा. इंदिरानगर, हावरगाव रोड, कळंब), स्वाती उर्फ आरती गणेश कुऱ्हाडे (२८, रा. सप्तसूर कला केंद्र कॉलनी, जामखेड, जि. अहिल्यानगर) आणि लक्ष्मी बालाजी पवार (३०, रा. बसस्थानक डेपोच्या पाठीमागे, कळंब, जि. धाराशिव) यांचा समावेश आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, जामखेड येथील कला केंद्रात महिला आणि पुरुषांमध्ये झालेल्या वादातून या हत्येचा कट रचण्यात आल्याचे समोर आले आहे. या वादाचे नेमके स्वरूप आणि हत्येमागील कारणांचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. २२ सप्टेंबर रोजी डायल ११२ वरून गरताडबारी परिसरात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पडल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर मोहाडी नगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी अंदाजे १८ ते ३० वर्षे वयोगटातील महिलेचा पूर्णतः जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी विविध पातळ्यांवर तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालात संबंधित महिला गर्भवती असल्याचे आणि तिच्यासह पोटातील अर्भकाचाही मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली.
घटनेनंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे अवघ्या तीन दिवसांत आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१) अन्वये गुन्हा क्रमांक ३२२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी सफराज मोमीन याच्याविरुद्ध धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी नगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा गोपीचंद पाटील आणि तपास पथकाने कामगिरी बजावली.
या हत्याकांडामागील नेमका हेतू, आरोपी व मृत महिलेतील संबंध तसेच कटाची संपूर्ण पार्श्वभूमी तपासातून स्पष्ट होणार आहे. पुढील चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
