धुळे, नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि उपचारासाठी पुण्यात जाणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ‘धुळे-पुणे-धुळे’ स्वतंत्र रेल्वे सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी मी धुळेकर संस्थेच्या वतीने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे लेखी निवेदनातून करण्यात आली आहे.

‘मी धुळेकर’ संस्थेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांच्यासह छोटू पोतदार, दिनेश वाघ, प्रदीप शेख, अग्निम शेख यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने ही मागणी केली आहे.

प्रसिद्धीपत्रकानुसार, नरडाणा व धुळे एमआयडीसी परिसरात गेल्या काही वर्षांत उद्योगांची संख्या वाढल्याने पुण्याकडे प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र सध्या नागरिकांना बस किंवा खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून हा प्रवास अनेकांसाठी खर्चिक ठरत आहे. कोरोना काळापूर्वी धुळे-पुणे मार्गावर दोन विशेष रेल्वे फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्या वेळी या सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. धुळे-मुंबई रेल्वेप्रमाणेच धुळे-पुणे रेल्वेलाही मोठा प्रतिसाद मिळू शकतो, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.

धुळे जिल्ह्याची वाढती लोकसंख्या, पुण्याकडे शिक्षण, नोकरी, व्यवसाय व वैद्यकीय उपचारांसाठी होणारा प्रवास आणि उद्योग क्षेत्रातील वाढ लक्षात घेता ही रेल्वे सेवा सुरू करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या रेल्वेमुळे धुळे रेल्वे स्थानक परिसरात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि जिल्ह्यातील उद्योगांनाही चालना मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.

धुळे-पुणे रेल्वे सेवा सुरू झाल्यास धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच उत्तर महाराष्ट्रातील हजारो प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि परवडणारा प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, आयटी व औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी, व्यावसायिक तसेच वैद्यकीय उपचारांसाठी पुण्याकडे जाणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना या रेल्वेचा मोठा लाभ होईल. त्यामुळे रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्यासही मदत होईल, असे संस्थेने नमूद केले आहे.

दरम्यान, धुळे शहरातून थेट पुण्याला नियमित रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होत आहे. केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती संख्या, भविष्यातील औद्योगिक विकास आणि उत्तर महाराष्ट्राच्या गरजा लक्षात घेऊन या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी अपेक्षा ‘मी धुळेकर’ संस्थेने व्यक्त केली आहे. तसेच या मागणीबाबत सकारात्मक निर्णय झाल्यास उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वासही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.