धुळे : शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या धुळे रेल्वे स्थानकाचा आता नव्या रूपात विस्तार होत असून, अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत विविध विकासकामांना वेग आला आहे. स्थानक परिसराचा विस्तार, नव्या गुड शेडची उभारणी, विस्तारित फलाट, प्रशस्त शेड, सुशोभिकरण आणि प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा यामुळे धुळे रेल्वे स्थानकाचे स्वरूप लवकरच अधिक आकर्षक, आधुनिक आणि सुविधायुक्त होणार आहे.
देशभरातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या अमृत भारत स्थानक योजनेत धुळे स्थानकाचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत स्थानकाच्या पायाभूत सुविधांमध्ये व्यापक बदल करण्यात येत असून, टप्प्याटप्प्याने विविध विकासकामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी करण्याबरोबरच मालवाहतुकीची क्षमताही वाढणार आहे. स्थानकावर नव्याने उभारण्यात येत असलेले गुड शेड हे व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रासाठी मोठे वरदान ठरणार आहे. कृषीमाल, औद्योगिक साहित्य तसेच इतर वस्तूंची रेल्वेमार्गे जलद, सुरक्षित आणि कमी खर्चात वाहतूक करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. भविष्यात धुळे हे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मालवाहतूक केंद्र म्हणूनही विकसित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी विस्तारित फलाट, लांब व प्रशस्त प्लॅटफॉर्म शेड, आकर्षक प्रवेशद्वार, सुधारित प्रतीक्षागृह, स्वच्छतागृहे, दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा, आधुनिक प्रकाशयोजना, डिजिटल माहिती फलक, सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुधारित सुविधा, सुशोभिकरण आणि हरित परिसर विकसित करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातील बहुतांश कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून, स्थानक परिसरातील अंतर्गत रस्ते, वाहनतळ आणि प्रवाशांच्या हालचाली अधिक सुलभ करण्यासाठीही नियोजनबद्ध कामे सुरू आहेत. धुळे रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण हे केवळ प्रवासी सुविधांपुरते मर्यादित नसून भविष्यातील वाढत्या रेल्वे वाहतुकीचा विचार करून करण्यात येत आहे. स्थानकाचे वाढते क्षेत्रफळ, सुधारित पायाभूत सुविधा आणि मालवाहतुकीसाठी उपलब्ध होणाऱ्या नव्या सोयींमुळे धुळे रेल्वे नकाशावर अधिक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासालाही नवी दिशा मिळणार आहे. याशिवाय, प्रस्तावित मनमाड-धुळे-इंदूर ब्रॉडगेज रेल्वे मार्ग साकार झाल्यानंतर धुळे स्थानकाचे महत्त्व आणखी वाढणार आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि देशातील प्रमुख रेल्वे मार्गांशी अधिक सक्षम संपर्क निर्माण होऊन प्रवासी तसेच मालवाहतुकीला मोठी गती मिळेल. या रेल्वेमार्गामुळे उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास नागरिक आणि व्यापारी वर्ग व्यक्त करत आहेत.
रेल्वे स्थानकाच्या सुरू असलेल्या विकासकामांमुळे भविष्यात धुळे शहराची ओळख केवळ प्रवासी स्थानक म्हणून नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मालवाहतूक आणि संपर्क केंद्र म्हणून अधिक बळकट होणार आहे. अमृत भारत योजनेमुळे स्थानकाचे रूपडे बदलत असतानाच प्रवाशांना दर्जेदार सुविधा, व्यापाऱ्यांना जलद मालवाहतूक आणि शहराला विकासाची नवी दिशा मिळणार आहे. आगामी काळात स्थानक परिसराचा सर्वांगीण विकास पूर्ण झाल्यानंतर धुळे रेल्वे स्थानक हे आधुनिक सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता आणि प्रवाशाभिमुख व्यवस्थापनाच्या दृष्टीने राज्यातील आदर्श स्थानकांपैकी एक ठरेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
