धुळे : अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत धुळे रेल्वे स्थानकाचा वेगाने कायापालट सुरू असून, स्थानकावर नव्या फलाटाची उभारणी, गुड्स शेडचा विस्तार आणि अतिरिक्त रूळ टाकण्याची तयारी सुरू झाली आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता तसेच भविष्यात नवीन रेल्वे सेवांना चालना देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने हा विस्तार महत्त्वाचा मानला जात आहे.

धुळे रेल्वे स्थानकावर आतापर्यंत मर्यादित फलाट आणि रूळांमुळे रेल्वे गाड्यांच्या नियोजनावर काही प्रमाणात मर्यादा येत होत्या. मात्र, आता नव्या फलाटाची निर्मिती आणि अतिरिक्त रूळांची व्यवस्था करण्यात येत असल्याने स्थानकाची क्षमता वाढणार आहे. एकाच वेळी अधिक रेल्वेगाड्यांची हाताळणी करणे, गाड्यांना थांबा देणे तसेच भविष्यात नवीन रेल्वे सेवांचे नियोजन करणे अधिक सुलभ होणार आहे.

स्थानकावरील गुड्स शेडच्या विस्तारामुळे मालवाहतूक व्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे. धुळे जिल्ह्यातील वाढते औद्योगिकीकरण, कृषी उत्पादनांची वाहतूक आणि प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर मालवाहतुकीसाठी सक्षम सुविधा उपलब्ध होणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे धुळे स्थानक केवळ प्रवासी वाहतुकीसाठी नव्हे, तर मालवाहतुकीचेही महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत धुळे स्थानकावर विस्तारित फलाट, आधुनिक प्रतीक्षागृह, दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा, आकर्षक प्रवेशद्वार, प्रशस्त पार्किंग, सुधारित प्रकाशयोजना, स्वच्छतागृहे, डिजिटल माहिती फलक, गुड्स शेड आणि परिसर सुशोभीकरण अशी विविध कामे सुरू आहेत.

त्यात नव्या फलाटाची भर पडल्याने स्थानकाच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. धुळे हे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असून, येथून पुणे, मुंबई, नाशिक आणि इंदूरसारख्या प्रमुख शहरांसाठी थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. स्थानकाच्या विस्तारीकरणामुळे धुळे-पुणे किंवा धुळे-मुंबईसारख्या प्रस्तावित रेल्वे सेवांसाठी आवश्यक सुविधा निर्माण होत असल्याचे मानले जात आहे. याशिवाय मंजूर झालेल्या धुळे-नरडाणा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर (इंदूर) नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गामुळे धुळे स्थानकाचे महत्त्व भविष्यात आणखी वाढणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर धुळे हे महत्त्वाचे रेल्वे केंद्र म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे.

त्यासाठी स्थानकावरील फलाट, रूळ आणि मालवाहतूक सुविधांचा विस्तार हा दूरदृष्टीचा भाग मानला जात आहे. नवीन फलाट, अतिरिक्त रूळ आणि विस्तारित गुड्स शेडमुळे धुळे रेल्वे स्थानकावर भविष्यात अधिक रेल्वेगाड्यांचे थांबे, नवीन मार्गांवरील सेवा आणि वाढीव रेल्वे वाहतुकीचे नियोजन होण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून धुळेकरांकडून थेट रेल्वे सेवांसाठी होत असलेल्या मागणीला या पायाभूत सुविधा विस्तारामुळे नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.