धुळे : मनमाड- इंदूर नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू असताना धुळे शहरातील विद्यमान रेल्वे स्थानकाला या नव्या मार्गाशी जोडण्याची संकल्पना पुन्हा चर्चेत आली आहे. सध्याच्या मंजूर आराखड्यानुसार नवीन रेल्वेमार्ग ‘न्यू धुळे (बोरविहीर/बाळापूर)’ स्थानकातून पुढे नरडाण्याकडे जाणार आहे. त्यामुळे शहरातील विद्यमान धुळे रेल्वे स्थानक आणि न्यू धुळे (बोरविहीर/बाळापूर परिसर) ही दोन स्वतंत्र स्थानके राहणार आहेत. मात्र, भविष्यात या दोन्ही स्थानकांना स्वतंत्र जोडमार्गाने जोडल्यास धुळे शहराच्या रेल्वे विकासाला नवे परिमाण मिळू शकतील.

रेल्वे तज्ज्ञांच्या मते, विद्यमान धुळे रेल्वे स्थानकातून उत्तर-पश्चिम दिशेला सुमारे सात ते दहा किलोमीटरचा नवीन स्पर (जोड) रेल्वेमार्ग उभारून तो न्यू धुळे (बोरविहीर/ बाळापूर) स्थानकाशी जोडणे तांत्रिकदृष्ट्या शक्य ठरू शकते. अंतिम अंतर आणि मार्ग रेल्वेच्या सविस्तर अभियांत्रिकी आराखड्यानुसार निश्चित होईल. हा जोडमार्ग उभारल्यास धुळे शहरातील स्थानक थेट मनमाड-इंदूर मुख्य मार्गाशी जोडले जाईल. या जोडणीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे धुळे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांना रिव्हर्स हालचाल न करता थेट मुख्य मार्गावर प्रवेश मिळू शकतो. परिणामी धुळे-मुंबई, धुळे-पुणे, धुळे-मनमाड, धुळे-इंदूर, धुळे-दिल्ली तसेच उत्तर भारताकडे जाणाऱ्या दीर्घ पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याचा मार्ग अधिक सुकर होऊ शकतो. याशिवाय, शहरातील प्रवाशांना न्यू धुळे स्थानकापर्यंत जाण्याची गरज कमी होऊन विद्यमान शहरातील स्थानकावरूनच प्रवास करता येईल.

धुळे शहरातील रेल्वे स्थानक हे शहराच्या मध्यवर्ती भागाजवळ असल्याने प्रवाशांना वाहतूक खर्च आणि वेळ दोन्हीची बचत होऊ शकते. तसेच न्यू धुळे (बोरविहीर) स्थानक हे मालवाहतूक, लांब पल्ल्याच्या गाड्या आणि जंक्शन म्हणून विकसित होऊ शकते, तर विद्यमान धुळे स्थानक शहरातील प्रवासी वाहतुकीचे प्रमुख केंद्र म्हणून कार्यरत राहू शकते. त्यामुळे दोन्ही स्थानकांचा संतुलित विकास साधणे शक्य होईल. यामुळे धुळे-चाळीसगाव विद्यमान मार्गाचाही अधिक प्रभावी वापर होऊ शकतो. भविष्यात या जोडमार्गामुळे धुळे – चाळीसगाव – मनमाड आणि मनमाड – इंदूर या दोन्ही मार्गांदरम्यान रेल्वे वाहतुकीची लवचिकता वाढण्याची शक्यता आहे. रेल्वे संचालन अधिक कार्यक्षम होण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी मार्गही उपलब्ध होऊ शकतो अशी माहीती सूत्रांनी दिली. मात्र, धुळे शहरातील विद्यमान स्थानक ते न्यू धुळे (बोरविहीर/बाळापूर) स्थानक जोडणाऱ्या स्पर लाइनला रेल्वे मंत्रालयाने अद्याप कोणतीही अधिकृत मंजुरी दिली नसल्याचे म्हटले जाते. याबद्दल अधिकृत माहीती मिळाली नाही. या प्रस्तावासाठी स्वतंत्र सर्वेक्षण, सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासणी आणि केंद्र सरकारची मंजुरी आवश्यक राहणार आहे. त्यामुळे हा पर्याय सध्या तांत्रिकदृष्ट्या शक्य असलेली संकल्पना असून, भविष्यातील नियोजनाचा भाग म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. अशा जोडणीची अंमलबजावणी झाल्यास मात्र धुळे जिल्ह्याच्या रेल्वे संपर्कात मोठी क्रांती घडून येऊ शकते.

याशिवाय, धुळे शहरातील विद्यमान रेल्वे स्थानक आणि न्यू धुळे (बोरविहीर/ बाळापूर) स्थानक यांच्यात जोडमार्ग उभारल्यास भविष्यात धुळे येथे ‘रेल्वे जंक्शन’ विकसित करण्याची संधी निर्माण होऊ शकते. मनमाड – इंदूर मुख्य मार्ग, धुळे- चाळीसगाव विद्यमान मार्ग आणि प्रस्तावित धुळे- पुणे, धुळे- मुंबई किंवा धुळे- नाशिकसारख्या नवीन रेल्वे सेवांचे नियोजन अधिक सुलभ होईल. औद्योगिक क्षेत्र, कृषी उत्पादन आणि मालवाहतुकीलाही मोठी चालना मिळू शकते. धुळे, शिरपूर, साक्री आणि नंदुरबार परिसरातील प्रवाशांसाठी शहरातील विद्यमान स्थानकावरूनच दूरपल्ल्याच्या गाड्यांची सुविधा उपलब्ध झाल्यास न्यू धुळे स्थानकावर जाण्यासाठी अतिरिक्त प्रवासाची गरज कमी होईल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ, खर्च आणि वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच धुळे शहराचे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे रेल्वे केंद्र म्हणून स्थान अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.