धुळे : धुळे रेल्वे स्थानकाला गाड्यांचे प्रारंभ आणि अंतिम स्थानक अर्थात पूर्ण क्षमतेचे रेल्वे टर्मिनस म्हणून विकसित करण्याच्या मागणीला आता राष्ट्रपती सचिवालयाचे व्यासपीठ मिळाले आहे. धुळे येथील धुळे रेल्वे स्थानक टर्मिनस व विमानतळ विकास मंचाचे अध्यक्ष गणेश शंकरलाल शर्मा यांनी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे अधिकृत तक्रार व पाठपुरावा निवेदन सादर करून धुळे रेल्वे स्थानकाच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

धुळे रेल्वे स्थानकाचा टर्मिनस विकास हा नवीन विषय नसून गेल्या १६ वर्षांपासून सुरू असलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आहे. सन २०१० पासून खासदार, आमदार, माजी लोकप्रतिनिधी, रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे प्रशासनाकडे विविध स्तरांवर पत्रव्यवहार करून धुळे स्थानकाला प्रारंभ–अंतिम रेल्वे स्थानकाचा दर्जा देण्याची मागणी करण्यात येत आहे.

किती लोकप्रतिनिधी एकवटले…

या पाठपुराव्यात खासदार पी. आर. सोनवणे, माजी आमदार शरद पाटील यांनी १४ मार्च २०१३ रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री पवन कुमार बन्सल यांना पाठविलेल्या पत्राचा समावेश आहे. तसेच खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेश चव्हाण, अनुपभैय्या अग्रवाल आणि आमदार राघवेंद्र रामदादा पाटील यांनीही धुळे रेल्वे विकासासाठी समर्थन दर्शविणारा पत्रव्यवहार केला आहे. अलीकडील काळात खासदार मेधा कुलकर्णी, खासदार धनंजय महाडिक, खासदार नारायण राणे आणि अमृतसरचे खासदार गुरजीत सिंह औजला यांनीही धुळे रेल्वे जोडणी वाढविण्यासाठी संबंधित स्तरावर पाठपुरावा केला आहे असा दावा शर्मा यांनी यावेळी केला.

२२ ते २४ डब्यांच्या रेल्वे गाड्यांसाठी पूर्ण लांबीचे फलाट…

धुळे स्थानकाला पूर्ण क्षमतेचे प्रारंभ–अंतिम रेल्वे टर्मिनस बनविण्यासाठी रेल्वे यार्डची पुनर्रचना, २२ ते २४ डब्यांच्या रेल्वे गाड्यांसाठी पूर्ण लांबीचे फलाट, गाड्यांच्या देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था, डबे स्वच्छ करण्याची सुविधा, दुरुस्ती व्यवस्था, गाड्या उभ्या करण्यासाठी अतिरिक्त मार्ग, विद्युत वाहिनी, संकेत व्यवस्था, पाणीपुरवठा आणि अन्य आवश्यक तांत्रिक सुविधांचे मूल्यांकन करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, अंदाजपत्रक निश्चित करणे, प्रशासकीय मंजुरी मिळविणे, निधी उपलब्ध करून देणे आणि टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करण्याची निश्चित कालमर्यादा ठरविण्याची मागणीही करण्यात आली आहे. दिल्ली, अमृतसर, अयोध्या, वाराणसी, गोरखपूर, लखनऊ, हरिद्वार, जयपूर–रणथंबोर, रेवा–जबलपूर–अमरकंटक, उज्जैन, मडगाव, हैदराबाद, तिरुपती, रामेश्वरम, चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता, पाटणा आणि पुरी या शहरांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, नांदेड, कोल्हापूर, नागपूर, परळी–लातूर, पंढरपूर आणि सावंतवाडी या महत्त्वाच्या शहरांसाठीही रेल्वे जोडणीची मागणी करण्यात आली आहे. या जोडण्यांमुळे धुळे जिल्ह्यातील प्रवासी, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ होऊ शकतो. राष्ट्रपती सचिवालयाकडे रेल्वे मंत्रालय, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित अधिकारी आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून मुद्देनिहाय कृती अहवाल मागविण्याची विनंती करण्यात आली आहे. या अहवालात धुळे टर्मिनससाठी आवश्यक कामांची सद्यस्थिती, टर्मिनस क्षमतेचे मूल्यांकन, जबाबदार विभाग, प्रकल्प अहवाल व निधीची स्थिती, नवीन रेल्वे जोडण्यांची व्यवहार्यता आणि अंमलबजावणीची कालमर्यादा स्पष्ट करण्याची मागणी आहे.

“धुळे रेल्वे टर्मिनसचा विषय केवळ नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्यापुरता मर्यादित नाही. हा विषय पायाभूत सुविधा, तांत्रिक क्षमता, रेल्वे संचालनाची व्यवहार्यता आणि आंतरराज्यीय प्रवासी जोडणीच्या व्यापक विकासाशी संबंधित आहे. २०१० पासून सुरू असलेल्या १६ वर्षांच्या पाठपुराव्याला आता ठोस, पारदर्शक आणि कालमर्यादित प्रशासकीय कार्यवाही मिळावी,” अशी अपेक्षा गणेश शंकरलाल शर्मा यांनी व्यक्त केली आहे.