धुळे : शहराच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शहरालगतच्या रावेर येथील गट क्रमांक ८० मधील तब्बल २९० हेक्टर आर क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित झाल्यानंतर त्यातील ४० हेक्टर जागा महाकाया लॉजिस्टिक्स आणि फ्राईट प्रा. लि. यांना टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारण्यासाठी भाडेपट्ट्याने देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

मंत्रालयातील दालनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार (दि.३०) दुपारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह महसूल विभाग आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी ऑनलाइन माध्यमातून बैठकीत सहभाग घेतला.

धुळे जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग तसेच प्रस्तावित रेल्वे जोडणीमुळे रावेर परिसराचे औद्योगिक महत्त्व वाढले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीच्या सुविधेमुळे हा भाग भविष्यात लॉजिस्टिक्स केंद्र आणि वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धुळे आणि रावेर परिसरात मोठ्या प्रमाणावर वस्त्रोद्योग व मालवाहतूक आधारित उद्योग उभारण्यासाठी उद्योजकांकडून पाठपुरावा सुरू होता. आता २९० हेक्टर जमीन उपलब्ध झाल्याने या प्रयत्नांना गती मिळणार आहे. रावेर येथील या जमिनीचे मूल्यांकन ११९ कोटी ५९ लाख २९ हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे. एमआयडीसीकडून ही रक्कम वसूल करून भोगवटा वर्ग दोन धारणाधिकाराने कब्जे हक्काने जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रकल्पामुळे औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार असल्याबद्दल आ. अनुप अग्रवाल यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, धुळे शहरातील सर्व्हे क्रमांक ४१० मधील ४१ एकर जागेवर उत्कृष्ट दर्जाचे थीम पार्क विकसित करण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडण्यात आला. मात्र सध्या जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन हे काम तूर्त हाती घेऊ नये, अशा सूचना महसूलमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या. महिंदळे शिवारातील सर्व्हे क्रमांक २४ मधील जागेवर ट्रॅव्हल्स पॉईंट उभारण्याचेही नियोजन आहे. यासाठी पाटबंधारे विभागाचा अभिप्राय आवश्यक असून तो प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. रावेरमधील औद्योगिक प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाल्याने धुळ्याच्या विकासाच्या प्रवासाला नवे बळ मिळणार असून भविष्यात हा परिसर उद्योग, वाहतूक आणि रोजगार निर्मितीचे महत्त्वाचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे.

या निर्णयामुळे धुळे जिल्ह्याच्या औद्योगिक नकाशावर रावेर परिसराचे महत्त्व आणखी वाढणार आहे. मोठ्या उद्योगांसोबतच पूरक लघु व मध्यम उद्योग, वाहतूक सेवा, गोदाम व्यवस्था, पॅकेजिंग, प्रक्रिया उद्योग यांनाही चालना मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्यास धुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगारासाठी बाहेरच्या शहरांकडे जाण्याची गरज कमी होऊ शकते. त्यामुळे रावेर येथील हा प्रकल्प केवळ जमीन हस्तांतरणाचा निर्णय नसून धुळ्याच्या दीर्घकालीन औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे असे उद्योजक भरत अग्रवाल म्हणाले.