धुळे : धुळे एमआयडीसीतील औद्योगिक भूखंडांची कमतरता दूर होणार का आणि जिल्ह्यात उद्योगांची नवी लाट उसळणार का, याबाबत उत्सुकता वाढविणाऱ्या घडामोडीत रावेर येथील नव्या औद्योगिक क्षेत्राच्या मंजुरीमुळे धुळ्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची चिन्हे आहेत. जिल्हास्तरीय उद्योगमित्र समितीच्या बैठकीत या निर्णयाचे स्वागत करत पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, इतर लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. उद्योगवाढ, निर्यात आणि रोजगारनिर्मिती यासाठी प्रशासन व उद्योजकांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत रावेर औद्योगिक क्षेत्र, धुळे व नरडाणा औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित प्रश्न, पायाभूत सुविधा, निर्यातवाढ आणि उद्योजकांच्या अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण, जिल्हा उद्योग केंद्र, कौशल्य विकास विभाग तसेच विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
धुळे एमआयडीसीमध्ये उपलब्ध जागेअभावी अनेक उद्योग विस्ताराच्या प्रतीक्षेत होते. रावेर औद्योगिक क्षेत्रासाठी जमीन कृषी दराच्या आधारे संपादित झाल्याने तुलनेने परवडणाऱ्या दरात भूखंड उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यामुळे लघु व मध्यम उद्योगांना मोठा दिलासा मिळणार असून नवीन गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता औद्योगिक संघटनांनी व्यक्त केली. बैठकीत जिल्हाधिकारी विसपुते यांनी भूखंड वाटप करूनही उद्योग सुरू न करणाऱ्या प्रकरणांची तपासणी करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
उपलब्ध औद्योगिक जमीन प्रत्यक्ष उत्पादन आणि रोजगारनिर्मितीसाठी वापरली गेली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. धुळ्यात तयार होणाऱ्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी निर्यातक्षम उत्पादनांची निवड, गुणवत्ता वाढ आणि आवश्यक मार्गदर्शनावर विशेष भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. उद्योग विभाग आणि औद्योगिक संघटनांनी समन्वयाने काम करून जिल्ह्याची निर्यात क्षमता वाढवावी, असे आवाहन करण्यात आले.
१२ हजार कोटी रुपयांची गुंतवणुक?
नरडाणा औद्योगिक क्षेत्रातील सुमारे १२ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा उल्लेख करत तेथील रस्ते, वीजपुरवठा, वाहतूक आणि प्रवेशमार्गांच्या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी बैठकीत झाली. बाभळे फाटा येथे उड्डाणपूल, प्रवेशद्वार रुंदीकरण, राष्ट्रीय महामार्गाशी सक्षम जोडणी तसेच स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या मागणीवरही चर्चा झाली. प्रलंबित प्रस्तावांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
यावेळी धुळे एमआयडीसीतील अतिक्रमण, वीजपुरवठा, वजन-माप नियंत्रण कायद्यातील नूतनीकरण शुल्क, शासनस्तरीय प्रलंबित प्रश्न आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलेल्या कामांच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. जिल्हा उद्योग केंद्राने २०२५-२६ या वर्षात ७२० युवकांना उद्योजकता प्रशिक्षण देत शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती केल्याची माहिती देण्यात आली. नव्या औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार, उद्योगांना विस्तार आणि धुळ्याला गुंतवणुकीचे सक्षम केंद्र बनविण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले.
