धुळे : सातत्याने वीज पुरवठा खंडित होणे, कमी-अधिक दाबामुळे वीज उपकरणे जळणे, यांसह इतर समस्यांना वैतागलेल्या धुळ्यातील प्रभाग क्रमांक ११ मधील रहिवाशांनी शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) नेतृत्वाखाली शुक्रवारी महावितरण कंपनीच्या कार्यपद्धतीविरुद्ध धरणे आंदोलन केले.
कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन यांना यापूर्वीच शहरातील अनेक भागातील ग्राहकांनी निवेदने दिली असताना शुक्रवारी प्रभाग क्रमांक ११ मधील रहिवाशांनी महाजन यांच्यासमोर समस्या मांडल्या. विजेसंदर्भातील सर्व समस्या लवकरच दूर करण्याचे आश्वासन महाजन यांनी रहिवाशांच्या शिष्टमंडळास दिले.
शिवसेना (उध्दव ठाकरे) चंद्रशेखर आझाद नगर विभागाच्या वतीने वीज कंपनीच्या पारोळा रोड उपकेंद्र कार्यालयाबाहेर झालेल्या या आंदोलनात ठाकरे गटाचे विभाग प्रमुख सागर निकम यांच्यासह बाबूभाई पटेल, उपमहानगर प्रमुख तथा वाहतूक सेना प्रमुख पंकज भारस्कर, ज्योती चौधरी यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
या आंदोलना विभागप्रमुख सागर निकम यांनी माहिती दिली. अनेक दिवसांपासून प्रभाग ११ आणि परिसरातील वीज ग्राहकांना वीज वितरण कंपनीकडून प्रचंड प्रमाणात वाढीव वीज देयक देण्यात येत आहे. सदोष मीटर, मीटर रिडिंग व्यवस्थित न करणे आणि वीज विभागाच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक प्रचंड प्रमाणात हैराण झाले असून वापर नसतानाही तीन हजार, पाच हजार आणि १५ हजार रुपयांपर्यंत नागरिकांना महिन्याला वीज देयक देण्यात येत आहे.
तसेच वीज असतांना मीटर जे रिडींग दाखवते, तेच मीटर जर काही मिनिटे वीज पुरवठा खंडित होऊन परत सुरळीत झाल्यास थेट १०० ते २०० युनिट वाढलेले दाखवते. त्यामुळे लोकांना प्रचंड वाढीव वीज देयक येत आहे. ही वाढीव देयके कमी केली जावीत, सदोष मीटर तपासणी करुन मीटर खराब असेल तर नवीन बसवून द्यावेत, लोकांना योग्य ती सुविधा मिळावी, अशा मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. शिष्टमंडळाच्या मागण्यांविषयी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता महाजन यांनी दिले असल्याची माहिती निकम यांनी दिली.
सदोष मीटर, युनिटमध्ये अचानक होणारी वाढ या तक्रारी सोडविण्यात येतील. तसेच वाढीव देयकांची तपासणी करुन योग्य त्याच युनिटप्रमाणे वीज दर आकारणी होईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. या आंदोलनात आबा अमृतकर, सागर साळवे यांसह परिसरातील अनेक महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.