धुळे : शहरातील सांडपाण्याच्या गटारिंची व्यवस्था किती धोकादायक अवस्थेत आहे, याचे थरारक उदाहरण समोर आले असून गटारीतून थेट स्वच्छतागृहातील ‘कमोड’पर्यंत सर्पराज पोहोचल्याची धक्कादायक घटना धुळ्यात घडली.

शहरातील साक्री रोडवरील विद्यावर्धिनी परिसरातील सप्तश्रृंगी मंदिराजवळ काही दिवसांपूर्वी नागोबासदृश सर्प गटारीत फिरताना नागरिकांनी पाहिला होता. त्या सर्पाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला होता. मात्र, हा सर्प केवळ गटारीपुरताच मर्यादित न राहता तब्बल महिनाभरानंतर थेट नागरिकांच्या घरात घुसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सप्तश्रृंगी मंदिरापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर असलेल्या महावीर कॉलनीत, मोराणे शिवारातील ‘हॉटेलचे मालक व सामाजिक कार्यकर्ते सुभाष हिलालसिंग राजपूत यांच्या निवासस्थानी ही घटना घडली. दुपारच्या सुमारास राजपूत यांच्या पत्नी स्वच्छतागृहाची साफसफाई करीत होत्या. नेहमीप्रमाणे त्यांनी कमोडमध्ये फिनाईल टाकले. त्यावेळी आत काही काळे पडलेले मोजे असावेत, असे प्रथमदर्शनी त्यांना वाटले. मात्र, क्षणार्धातच त्या ‘मोज्याने’ डोके वर काढताच ते दृश्य पाहून त्यांचा थरकाप उडाला. तो नागोबासदृश सर्प असल्याचे लक्षात येताच त्यांनी घाबरून पती सुभाष राजपूत यांना फोन करून घटनेची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सुभाष राजपूत यांनी तातडीने मोराणे येथील सर्पमित्रांशी संपर्क साधत त्यांना सोबत घेतले आणि घरी धाव घेतली. सर्पमित्रांनी प्रसंगावधान राखत अत्यंत शिताफीने त्या सर्पराजाचा ताबा घेतला. कोणतीही इजा किंवा जीवितहानी न होता या अनाहुत आलेल्या सर्पाला सुरक्षितपणे पकडण्यात यश आले. सर्पमित्र व प्रत्यक्षदर्शी जाणकारांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी सप्तश्रृंगी मंदिराजवळ गटारीत दिसलेला सर्प आणि राजपूत यांच्या घरात आढळलेला सर्प हे एकच असल्याची शक्यता अधिक आहे.

दरम्यान, या सर्पाने घरात प्रवेश कसा केला, याबाबत धक्कादायक कयास व्यक्त करण्यात येत आहेत. महापालिकेच्या तथाकथित विकासाभिमुख सेवेमुळे गटारींची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक ठिकाणी गटारी उद्ध्वस्त अवस्थेत आहेत. याच गटारीतून आउटलेट पाईपद्वारे हा सर्प थेट पाण्याच्या टाकीत आला असावा आणि त्या टाकीतून स्वच्छतागृहातील ‘कमोड’मध्ये त्याने प्रवेश केला असावा, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घरातील सर्वांत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या स्वच्छतागृहातही सर्प आढळत असल्याने नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. लोकहो, काळजी घ्या… काळ येऊ शकतो, पण वेळ येऊ देऊ नका, असा इशारा या घटनेतून मिळतो आहे.

सर्पही जगला पाहिजे आणि माणूसही; मात्र उभयतांनी एकमेकांच्या अधिवासात अतिक्रमण करता कामा नये, हेच या घटनेतून अधोरेखित होते. कटू सत्य असे की, आपणच त्यांच्या नैसर्गिक अधिवासात घुसखोरी केली आहे. त्यामुळे प्रशासनाने गटारी, ड्रेनेज आणि नागरी पायाभूत सुविधा तातडीने दुरुस्त कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.