धुळे : राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीच्या अनुदानाचा पुढील हप्ता मंजूर करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारणाऱ्या साक्री पंचायत समितीच्या तांत्रिक सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई आज (दि.३०) करण्यात आली.
या प्रकरणी नितीन नारायण वारकर ( ५२, रा. बाहुबली नगर, प्लॉट नं. ५२, साक्री रोड, धुळे) असे कारवाई झालेल्या तांत्रिक सहाय्यकाचे नाव असून साक्री पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या भावास महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०२३-२४ मध्ये विहीरीच्या खोदकामासाठी चार लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते. त्यासाठी साक्री पंचायत समिती मार्फत कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. त्यानुसार विहिरीचे काम सुरू करण्यात आले आहे.दरम्यान, या कामाच्या प्रगतीनुसार संबंधित लाभार्थ्यास अनुदानाचे एकूण १५ हप्ते प्राप्त झाले होते. यानंतर उर्वरित अनुदान मंजूर होण्यासाठी तांत्रिक सहाय्यक नितीन वारकर यांनी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी विहिरीचे मोजमाप करून एक लाख ६२ हजार ३२० रुपयांचे मूल्यांकन मोजमाप पुस्तिकेत नोंदविले होते.
मात्र ही मोजमाप पुस्तिका शाखा अभियंत्याकडे तपासणीसाठी पाठविण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदार यांनी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता संशयित नितीन वारकर याने १५ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर १० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान नितीन वारकर यांनी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, चंद्रकांत सैंदाणे आदींच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला. या कारवाईस पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांचे मार्गदर्शन लाभले.
- लाचलूचपत विभागाचे आवाहन
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी किंवा खासगी व्यक्तीने काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ विभागाशी संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.
