धुळे:  उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे जाळे विस्तारण्यासाठी धुळे–साक्री–नवापूर–सूरत तसेच नवे धुळे (बाळापूर)–पारोळा– एरंडोल–जळगाव हे दोन नवीन रेल्वे मार्ग उभारावेत, अशी मागणी रेल्वे मार्ग संघर्ष समितीने पुन्हा एकदा जोरदारपणे मांडली आहे.

यासंदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देत या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, असे साकडे घातले. रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर जाधव, उपाध्यक्ष शशीकांत वाघ, सचिव भरत जाधव आणि भूषण पाटील यांनी दिलेल्या निवेदनात या दोन्ही मार्गांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

धुळे–साक्री–नवापूर–सूरत हा रेल्वेमार्ग उभारल्यास साक्री ते नवापूरपर्यंतचा आदिवासी बहुल आणि तुलनेने मागासलेला भाग थेट रेल्वे जाळ्याशी जोडला जाईल. या मार्गामुळे परिसरातील दळणवळण सुलभ होऊन औद्योगिक विकासाला चालना मिळेल, तसेच शेतीमालाची वाहतूक सुलभ होऊन शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होईल, असे समितीच्या वतीने सांगण्यात आले. तसेच नवे धुळे (बाळापूर)– पारोळा–एरंडोल–जळगाव हा भाग स्वातंत्र्यानंतरही रेल्वे सेवेसाठी वंचित राहिल्याची खंत समितीने व्यक्त केली.

या भागातून रेल्वेमार्ग तयार झाल्यास गुजरातमधील प्रगत औद्योगिक शहरांशी उत्तर महाराष्ट्राचा संपर्क अधिक मजबूत होईल. यामुळे व्यापार, उद्योग आणि वाहतूक क्षेत्राला गती मिळून स्थानिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला. दरम्यान, या मागणीसाठी रेल्वे संघर्ष समितीने यापूर्वीही विविध आंदोलने, निवेदने आणि जनजागृती मोहीम राबवली आहे. रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण करून पुढील प्रक्रिया सुरू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. या प्रकल्पांमुळे परिसरातील युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, तसेच रोजगारासाठी इतर राज्यांमध्ये होणारे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल, असेही समितीने नमूद केले.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांनी संयुक्तपणे निधीची तरतूद करून रेल्वे मंत्रालयामार्फत या मार्गांचे सर्वेक्षण, मंजुरी आणि डीपीआर प्रक्रियेची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा रेल्वे संघर्ष समितीतर्फे व्यक्त करण्यात आली.