धुळे : स्थगित केलेली वेतनवाढ चालू करावी आणि वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यासाठी उपशिक्षकाकडून १५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. लाचेची रक्कम स्वीकारताना मांजरोद (ता. शिरपूर) येथील महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक व उपशिक्षकास रंगेहात पकडण्यात आले. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज ही कारवाई केली.
या सापळा कारवाईत शालेय शिक्षकांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याने शैक्षणिक वर्तुळात चर्चेला उधान आले. यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार जनता शिक्षण प्रसारक संस्था, बेटावद (ता. शिंदखेडा) संचलित महात्मा गांधी विद्यालय, मांजरोद (ता. शिरपूर) येथील मुख्याध्यापक कैलास सखाराम पाटील (वय ५६ वर्षे ) आणि उपशिक्षक गोपाल रघुनाथ पाटील (वय ४७ वर्षे ) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे संस्थेच्या शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची वार्षिक वेतनवाढ जुलै २०२३ पासून एक वर्षाकरिता स्थगित करण्यात आली होती तसेच सेवेस १२ वर्षे पूर्ण होऊनही वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली नव्हती.
या संदर्भात तक्रारदाराने मुख्याध्यापक कैलास पाटील यांची भेट घेऊन वेतनवाढ व वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्याची विनंती केली असता, मुख्याध्यापकांनी उपशिक्षक गोपाल पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे १५ हजार रुपये द्यावेत अन्यथा काम होणार नसल्याचे सांगितले. यामुळे तक्रारदाराने तत्काळ धुळे येथे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार नोंदवली. त्यानंतर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६ नोव्हेंबर रोजी तक्रारीची प्राथमिक पडताळणी केली. यातून मुख्याध्यापक कैलास पाटील यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठरलेल्या जागी शिरपूर येथे आज सापळा रचला. यावेळी उपशिक्षक गोपाल पाटील यांनी तक्रारदाराकडून १५ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली आणि लगेचच त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात मुख्याध्यापक कैलास पाटील व उपशिक्षक गोपाल पाटील या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांनी केले. सापळा अधिकारी यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक यांनी पथकाचे नेतृत्व केले. या पथकात पोलीस कर्मचारी जगदीश बडगुजर, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, पद्मावती कलाल, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, सुधीर मोरे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा तपास उपअधीक्षक सचिन साळुंखे हे करणार आहेत. या संपूर्ण कारवाईला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्रचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक सुनिल दोरगे यांचे मार्गदर्शन लाभले.
शासकीय, निमशासकीय किंवा खासगी पंटरकडून कोणत्याही प्रकारची लाच मागणी झाल्यास तत्काळ विभागाशी संपर्क साधावा. विभागाचा टोलफ्री क्रमांक १०६४ असून, दूरध्वनी क्रमांक ०२५६२-२३४०२० आहे. ईमेल – dyspacbdhule@gmail.com तसेच संकेतस्थळ – acbmaharashtra.gov.in या माध्यमातूनही संपर्क साधता येईल असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
