धुळे : प्रस्तावित मनमाड–इंदूर नव्या ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पात धुळे, सेंधवा तसेच आबू घाट–मानपूर परिसरात प्रमुख आणि लांब बोगद्यांचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी प्रकल्पाच्या मार्गाचा भूगर्भीय प्राथमिक अभ्यास अहवाल तयार करण्यात आला असून तो अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेला नाही. डोंगराळ भूभाग, कठीण खडकांची रचना आणि गुंतागुंतीची भूगर्भीय परिस्थिती लक्षात घेता या बोगद्यांचे बांधकाम हा संपूर्ण प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा आणि तितकाच आव्हानात्मक टप्पा मानला जात आहे. त्यामुळे या मार्गावरील अभियांत्रिकी कामाकडे रेल्वे क्षेत्रासह स्थानिक नागरिकांचेही लक्ष लागले आहे.

प्राथमिक अभ्यासानुसार, मनमाडपासून इंदूरपर्यंतचा रेल्वेमार्ग प्रामुख्याने दख्खन ट्रॅपमधील ज्वालामुखीजन्य बेसॉल्ट खडकांच्या पट्ट्यातून जाणार आहे. धुळे, सेंधवा आणि आबू घाट–मानपूर परिसरात सलग डोंगररांगा असल्याने रेल्वेमार्ग सुरक्षित, सरळ आणि आवश्यक उतारामध्ये ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी लांब बोगद्यांचा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो. त्यामुळे मार्गावरील वळणे कमी होऊन रेल्वेचा वेग आणि वाहतूक क्षमता वाढण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

रेल्वे मार्गाच्या पट्ट्यात करण्यात आलेल्या भूगर्भीय तपासणीत या भागात घन बेसॉल्ट खडकांसोबतच पोकळ्या असलेले खडक, नैसर्गिक तडे, भेगा आणि ज्वालामुखीजन्य डाइक मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच उत्तरेकडील नर्मदा–सोन भूरेषेच्या प्रभावामुळे काही भागांतील खडकांमध्ये अतिरिक्त भेगा निर्माण झाल्याचेही अभ्यासातून स्पष्ट झाल्याचे म्हटलेजाते आहे. त्यामुळे बोगद्यांचे खोदकाम करताना खडकांचे स्थैर्य, पाण्याचा झिरपण्याचा वेग आणि सुरक्षिततेचे निकष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. प्रत्येक टप्प्यावर सविस्तर भूगर्भीय चाचण्या करून त्यानुसार आधाररचना उभारावी लागणार आहे. या रेल्वे मार्गाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर काळी रेगूर माती आढळते.

पावसाळ्यात ही माती फुगते, तर उन्हाळ्यात आकसते. याचबरोबर भूजलाच्या प्रवाहावर परिणाम करणारे ज्वालामुखीजन्य डाइकही अनेक ठिकाणी आहेत. त्यामुळे बोगद्यांच्या प्रवेशद्वारांपासून ते अंतर्गत संरचनेपर्यंत विशेष अभियांत्रिकी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. आधुनिक यंत्रसामग्री, सातत्यपूर्ण भूगर्भीय निरीक्षण आणि सुरक्षितता मानकांचे काटेकोर पालन या प्रकल्पाच्या यशासाठी निर्णायक ठरणार आहे. दरम्यान, मनमाड–इंदूर रेल्वे प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक सक्षम होईल. मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतुकीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, धुळे, सेंधवा आणि आबू घाट–मानपूर परिसरातील प्रस्तावित बोगदे हे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सर्वात मोठे अभियांत्रिकी आव्हान ठरणार आहेत.

प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात प्रत्येक प्रस्तावित बोगद्याच्या परिसरात सखोल भू-तांत्रिक तपासणी, खडकांचे नमुने, भूजल पातळी, उतारांचे स्थैर्य आणि भूकंपीय परिणामांचा स्वतंत्र अभ्यास केला जाणार आहे. या निष्कर्षांच्या आधारे बोगद्यांचे अंतिम आराखडे, खोदकामाची पद्धत, संरक्षणात्मक आधाररचना आणि सुरक्षा मानके निश्चित केली जातील. त्यामुळे धुळे, सेंधवा आणि आबू घाट–मानपूर परिसरातील हे प्रस्तावित बोगदे केवळ रेल्वे संपर्क सुधारण्यापुरते मर्यादित न राहता, भारतीय रेल्वेच्या अत्याधुनिक अभियांत्रिकी क्षमतेची महत्त्वपूर्ण कसोटी ठरणार असल्याचे म्हटले जाते आहे. यासर्व शक्य-अशक्यतेमुळे मनमाड – इंदूर रेल्वे विविध लहान,मोठ्या आणि लांब अशा बोगद्यातून आणि जमिनीखालूनही धावणार आहेका, याबद्दल उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, अंतिम सर्वेक्षण, सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) आणि रेल्वे प्रशासनाच्या मंजुरीनंतरच बोगद्यांची अंतिम संख्या, लांबी आणि अचूक स्थान निश्चित होणार आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध माहिती ही प्रस्तावित स्वरूपातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.