धुळे, शिक्षकांच्या मान्यता आदेश व शालार्थ आयडीवरील कथित बनावट स्वाक्षऱ्यांबाबत वरिष्ठ कार्यालयात तक्रार केल्यामुळे पगार रोखण्यात आल्याचा राग मनात धरून जमावाने महेंद्र देसले यांच्या घरात घुसून शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याच्या आरोपाखाली शिंदखेडा पोलीस ठाण्यात तब्बल ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी महेंद्र पुंडलिक देसले (वय ४०, रा. माळीच, ता. शिंदखेडा, जि. धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास माळीच येथील त्यांच्या राहत्या घरात ही घटना घडली. शिक्षक मान्यता आदेश व शालार्थ आयडीवरील कथित बनावट स्वाक्षऱ्यांबाबत वरिष्ठ कार्यालयात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीमुळे संबंधित संशयितांचे पगार शिक्षण विभागाकडून रोखण्यात आले. याच कारणाचा राग मनात धरून संशयितांनी महेंद्र देसले यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला.
त्यानंतर घरातील कागदपत्रांची पाहणी करून देसले व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ, दमदाटी तसेच मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, गावातील नागरिक घटनास्थळी आल्याने वाद अधिक चिघळला. पोलिस येत असल्याची माहिती मिळताच संशयित त्यांच्या वाहनांतून तेथून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
संशयितांमध्ये महिलाही
या प्रकरणी हंसराज सुकलाल पाटील, राऊसाहेब छगन जाधव (दोघे रा. कलमाडी, ता. शिंदखेडा), संतोष भिमराव देसले (रा. माळीच, ता. शिंदखेडा), मुकेश विश्वास पाटील (रा. कंदे, ता. नंदुरबार), अमोल विश्वास बेहरे, योगेश सुधाकर पाटील, देवदत्त सुरेश पिंगळे (तिघे रा. नंदुरबार), दक्षता लोटन देसले, सुभाष भिमराव देसले, सरला संतोष देसले, प्रतिमा सुभाष देसले, नयन संतोष देसले, राहुल सुभाष देसले (सर्व रा. माळीच, ता. शिंदखेडा), किशोर लोटन पाटील (रा. धुळे), राहुल संजय खैरनार (रा. विटाई, ता. शिंदखेडा), प्रशांत गोकुळ पाटील (रा. कापडणे, ता. धुळे), जयपाल संजय गिरासे (रा. धांदरणे, ता. शिंदखेडा), भटू कांबळे (रा. मांडळ, ता. अमळनेर, जि. जळगाव), नितीन भिला पाटील (रा. होळ, ता. शिंदखेडा), प्राजक्ता नामदेव पाटील (रा. नरडाणा, ता. शिंदखेडा), उमेश पाटील, तुषार पाटील व नारायण सुरेश पाटील (सर्व रा. डाबली, ता. शिंदखेडा), सुरेश सिसोदे (रा. नरडाणा, ता. शिंदखेडा), ज्ञानेश्वर आधार पाटील, विजय कोकणी, मंगल कोकणी, नरेंद्र नामदेव शिंदे, सोनाली मगन पवार व कविता अंबादास भदाणे (सर्व रा. खांडबारा, ता. नवापूर), तसेच गणेश सुभाष कापडी, भावना अरविंद पाटील व विशाखा बच्छाव (सर्व रा. नंदुरबार) यांच्यासह एकूण ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शालार्थ आयडी प्रकरण गंभीर वळणावर
शिक्षक मान्यता आदेश आणि शालार्थ आयडीवरील कथित बनावट स्वाक्षऱ्यांच्या तक्रारीवरून सुरू झालेला वाद आता थेट फौजदारी गुन्ह्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात आधीच पगार रोखण्याची कारवाई झाल्यानंतर आता घरात घुसून मारहाण, दमदाटी व शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने शालार्थ आयडी प्रकरणाला गंभीर वळण लागले असून, शिक्षण विभागातील कथित गैरप्रकार आणि त्यानंतरच्या घडामोडींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
